नवी दिल्ली - आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट बँकेचा बँकिंग परवाना आरबीआयने रद्द केला आहे. बँकिंग नियमन कायद्यानुसार आरबीआयने ही पाऊल उचलले आहे. त्यामुळे आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट बँक यापुढे बँकिंग कंपनी राहणार नाही.
आदित्य बिर्ला आयडिया पेमेंटमध्ये चलनाच्या तरलतेची समस्या असल्याचे आरबीआयने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये म्हटले होते. त्यानंतर कंपनीने स्वेच्छेने बँकिंग सेवा बंद करण्यासाठी आरबीआयकडे अर्ज केला होता. आरबीआयने परिपत्रकात म्हटले आहे, आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट बँक ही बँकिंग कंपनी राहिली नाही.
व्यवसायात अनिश्चितता निर्माण झाल्याने आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट बँकेने काम थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट बँकेला आरबीआयकडून २०१७ ला पेमेंट बँकेचा व्यवसाय करण्यासाठी परवाना मिळाला होता. कंपनीने २२ फेब्रुवारी २०१८ नंतर व्यवसाय करण्यास सुरुवात केली होती.
आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँकेत ग्रासिम इंडस्ट्रीजचा ५१ टक्के तर व्होडाफोन आयडियाचा ४९ टक्के हिस्सा होता. आरबीआयने दुसऱ्या परिपत्रकात वेस्टपॅक बँकिंग कॉर्पोरेशनलाही बँकिंग व्यवसाय करण्यावर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे या कंपनीचे बँकिंग कंपनी म्हणून अस्तित्वात संपणार आहे.