महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

खान्देशात डिसेंबर अखेरपर्यंत ९ लाख गाठींची खरेदी

यंदा कापसाच्या खरेदीत वाढ होण्याची शक्यता होती. मात्र, अतिवृष्टीमुळे कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असले तरी कापूस खरेदीचे उद्दिष्ट साध्य होण्याची शक्यता आहे.

कापूस खरेदी न्यूज
कापूस खरेदी न्यूज

By

Published : Jan 1, 2021, 8:44 PM IST

Updated : Jan 1, 2021, 8:56 PM IST

जळगाव -सीसीआय व पणन महासंघाकडून कापूस खरेदी सुरू आहे. डिसेंबर अखेरपर्यंत खान्देशात ९ लाख गाठींची खरेदी झाली आहे. दरवर्षी खान्देशात सरासरी १५ लाख गाठींची खरेदी होत असते. यंदा कापूस उत्पादनात १० टक्क्यांची घट होण्याचा अंदाज आहे.

यंदा कापसाच्या खरेदीत वाढ होण्याची शक्यता होती. मात्र, अतिवृष्टीमुळे कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असले तरी कापूस खरेदीचे उद्दिष्ट साध्य होण्याची शक्यता आहे. यंदा १६ लाख गाठींची खरेदी होणार असल्याचा कापूस बाजारातील जाणकारांचा अंदाज आहे.

यंदा कापूस उत्पादनात १० टक्क्यांची घट होण्याचा अंदाज

खान्देशात सुमारे ८ लाख हेक्टरवर कापसाची लागवड केली जाते. यामध्ये जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक ५ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होते. यंदा कापसाच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली होती. यंदा कापसाचे लागवड क्षेत्र पाहता उत्पादन १८ लाख गाठींपर्यंत होण्याची शक्यता होती. मात्र, अवकाळी पावसामुळे कापसाचे उत्पादन १६ लाख गाठींपर्यंत राहण्याची शक्यता आहे.


येत्या काही दिवसात भाववाढीची शक्यता-

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा भारताच्या कापसाची निर्यात वाढली आहे. चीन, बांग्लादेश व व्हिएतनाम या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात सौदे झाले आहेत. गेल्या वर्षी भारताने ४६ लाख गाठींची निर्यात केली होती. यंदा भारताकडून तब्बल ६६ लाख गाठींची निर्यात होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी माल शिल्लक असल्याने जागतिक वस्त्रोद्योग बाजारपेठेत कापसाला मागणी नव्हती. यावर्षी मात्र, वस्त्रोद्योग बाजारपेठे कापसाला मोठी मागणी आहे. सोबतच अमेरिका व चीनमधील कापूस उत्पादनात मोठी घट झाली आहे. यामुळे अमेरिका व चीनने इतर देशांकडून कापूस आयात करण्यास सुरुवात केली आहे. ही बाब भारताच्या कापूस निर्यातीच्या पथ्यावर पडणार आहे. ही स्थिती पाहता येत्या काही दिवसात स्थानिक बाजारपेठेत कापसाचे भाव वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-नंदुरबार: खरेदी केंद्रावरून यंदा 90 हजार क्विंटलहून अधिक कापसाची खरेदी

मार्चपर्यंत कापसाचे दर ६ हजारांचा टप्पा गाठणार-

न्यूयॉर्क वायदे बाजारात कापसाचे दर ७८ सेंटवर पोहचले आहेत. सप्टेंबर महिन्यात हे दर ६६ सेंट इतके होते. यासह चीनमधील वस्त्रोद्योग बाजारपेठेसाठी दरवर्षी २ कोटी ५० लाख गाठींची आवश्यकता असते. त्यातील १ कोटी ५० लाख गाठींची गरज आपल्याच देशातून चीन भागवत असतो. यंदा चीनमध्येदेखील माल नसल्याने ३० लाख गाठींची आयात वाढविली आहे. त्यातच भारतातील मालाचा दर्जा चांगला व दर देखील कमी असल्याने चीनकडून भारताच्या मालाला प्राधान्य दिले जात आहे. भविष्यात ही मागणी वाढू शकते. यामुळे त्यामुळे मार्चपर्यंत भारतात ६ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-जळगाव जिल्ह्यात सीसीआयकडून 70 हजार गाठींची खरेदी

खासगी व्यापारी व सीसीआयचे भाव सारखेच-

सीसीआयने ग्रेड कमी केल्याने सरकारी खरेदी केंद्रावर कापसाला प्रति क्विंटल ५, ६८५ रुपये इतका भाव मिळत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची वाढती मागणी पाहता खासगी बाजारातदेखील ५५५० ते ५६०० रुपयापर्यंत कापसाचे भाव गेले आहेत. भविष्यात हे भाव वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या पाच वर्षातील कापूस खरेदी व लागवडीची स्थिती-

वर्ष खरेदी लागवड क्षेत्र
२०१६ १५ लाख गाठी ६ लाख ८० हजार हेक्टर
२०१७ १४ लाख गाठी ६ लाख ४५ हजार हेक्टर
२०१८ १५ लाख गाठी ७ लाख २३ हजार हेक्टर
२०१९ १७ लाख गाठी ७ लाख ४९ हजार हेक्टर
२०२० अंदाजित १६ लाख गाठी अंदाजित ८ लाख हेक्टर
Last Updated : Jan 1, 2021, 8:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details