मुंबई - कोरोनाच्या संकटाची कुऱ्हाड रोजगारक्षेत्रासह अनेक कंपन्यांच्या अस्तित्वावरच घाला घालणार आहे. प्रवास आणि पर्यटन क्षेत्रातील सुमारे ४० टक्के कंपन्या येत्या तीन ते सहा महिन्यात पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे. हा टाळेबंदीने परिणाम होणार असल्याचे एका अहवालात म्हटले आहे.
विशेष म्हणजे देशांतर्गत विमान सेवा सुरू होवूनही प्रवास आणि पर्यटन क्षेत्रातील ४० टक्के कंपन्या बंद होण्याचा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. बॉट ट्रॅव्हल कंपनीने आयएओटीओ, टीएएआय, आयसीपीबी, एडीटीओआय या संस्थांबरोबर पर्यटन आणि प्रवासी कंपन्यांची सद्यस्थिती दर्शविणारा अहवाल तयार केला आहे. सुमारे ८१ टक्के प्रवासी आणि पर्यटन कंपन्यांनी त्यांचा १०० टक्के महसूल गमविल्याचे अहवालात म्हटले आहे. तर १५ टक्के कंपन्यांचा महसूल हा ७५ टक्क्यापर्यंत कमी झाला आहे.