सॅनफ्रान्सिस्को– जगभरातील प्रतिष्ठित उद्योगपतींचे ट्विटर अकाउंट हॅक करत बिटकॉन घोटाळा करणारे अखेर अमेरिकेच्या निशाण्यावर आले आहेत. बिटकॉन घोटाळ्यातील तीन सायबर हल्लेखोरांविरोधात अमेरिकेच्या न्याय विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात पोलिसांनी कट करून फसवणूक, मनी लाँड्रिग आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ट्विटरच्या हॅकिंग प्रकरणात इंग्लंडमधील 19 वर्षांच्या मॅसन शेप्पार्डविरोधात कॅलिफोर्नियात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फ्लोरिडामधील ओरलँडो येथील रहिवासी असलेल्या 22 वर्षांच्या निरमा फजेली याच्याविरोधातही गुन्हा नोंदविल्याच्या अमेरिकेच्या न्याय विभागाने म्हटले आहे. बिटकॉन घोटाळ्यातील तिसरा आरोपी हा अल्पवयीन आहे.
असे घडले होते हॅकिंग -
ट्विटरचे हॅकिंग हे फोन फिशिंगच्या हल्ल्यामधून झाल्याचे ट्विटरने शुक्रवारी जाहीर केले होते. सायबर हल्लेखोरोंनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्ससह काही उद्योगपती, ओबामा यांच्यासारखे राजकीय नेते, सेलिब्रिटी अशी एकूण 130 ट्विटर अकाउंट हॅक केले होते, तर त्यांच्या ट्विटरवरून बिटकॉनची ऑफर असल्याचे जाहीर करत सायबर हल्लेखोरांनी बेकायदेशीरपणे 1 लाख डॉलर जमविले होते.
हॅकिंग प्रकरणानंतर ट्विटरमधील साधनांची कमरता समोर आली होती. सायबर हल्लेखोरांनी ट्विटरमधील तांत्रिक त्रुटी हेरून बिटकॉन घोटाळा केला होता. सॅन फ्रान्सिस्कोमधील अमेरिकेच्या गुप्तचर सेवा विभागाचे विशेष अधिकारी थॉमस एडवर्ड म्हणाले, की आरोपींवर गुन्हे दाखल झाल्याने सायबर गुन्हेगार जगापासून फार काळ लपून राहू शकत नसल्याचे सिद्ध झाले आहे. हॅकिंगचे प्रकार पुन्हा होवू नये, यासाठी ट्विटरने साधनांचा (टूल्स) वापर करण्यावर मर्यादा आणली आहे. त्याचा परिणाम ट्विटर डाटा डाउनलोड आणि युवर ट्विटर या सेवांवर होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.