कोलकाता - सरकारने खेळण्यांवर २०० टक्के आयात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने देशातील १ लाखांहून अधिक किरकोळ विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे. त्यामुळे आयात शुल्काला विरोध करत खेळणी आयातदारांनी शनिवारी संप पुकारला आहे.
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात खेळण्यांवर सुमारे २०० टक्के आयात शुल्क पुढील आर्थिक वर्षापासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशातील स्थानिक उत्पादक आणि लघु उद्योगांना चालना मिळेल, अशी सरकारची भूमिका आहे.
खेळणी घाऊक विक्रेत्यांनी कोलकात्यात एक दिवस संप पुकारला आहे. आयात शुल्क वाढल्याने काही व्यवसाय बंद होऊन बेरोजगारी वाढेल, असा विक्रेत्यांनी दावा केला आहे. खेळणी उद्योगामध्ये २०० टक्के आयात शुल्क लागू करण्याचा निर्णय हा धक्कादायक असल्याचे पश्चिम बंगाल एक्झिम असोसिएशनचे संयुक्त सचिव मोहीत बाँठिया यांनी म्हटले आहे. पूर्वीप्रमाणे २० टक्के आयात शुल्क लागू करावे, अशी मागणी असल्याचे बाँठिया यांनी सांगितले.