नवी दिल्ली- पेटंटची संख्या वाढविण्यासाठी सरकारसह अनेक संशोधकांना कसरत करावी लागते. अशी स्थिती असताना केवळ १२ वर्षाच्या नागपुरातील मुलाने ४ पेटंट दाखल केली आहेत. रेवंतच्या संशोधनातून तयार केलेल्या अॅपमुळे अपघात टाळणे, वाहन चोरी झाल्यास पकडणे आदी कामे सहजशक्य होतात. बी.एस. रेवंत नाम्बुरी असे या देशातील सर्वात कमी वयाच्या संशोधकाचे नाव आहे.
बी.एस. रेवंत नाम्बुरी याने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींना संशोधनाचे सादरीकरण दाखविले. यावेळी गडकरींनी रेवंतच्या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्षात वापर करण्यासाठी विभागाकडून मंजूरी देण्यात येईल, असे सांगितले.
त्याने तयार केलेल्या क्विक रिस्पॉन्स कोडने नेटवर्क नसले तरी डाटाची छपाई (प्रिंट) करणे शक्य होते. या तंत्रज्ञानाचा लोकांच्या हिताकरिता मोठ्या प्रमाणात सरकार अथवा खासगी कंपनीकडून मोठ्या प्रमाणात वापर व्हावा, ही त्यामागे कल्पना असल्याचे रेवंतने सांगितले.
रेवंतचे असे आहे संशोधन-
रेवंत हा नागपूरमधील माउंट लिटेरा झी स्कूलमध्ये आठवीत शिक्षण घेत आहे. त्याने तयार केलेल्या अॅपमध्ये वाहतुकीच्या नियमभंगाचे रिअल टाईम पाहणे, सीटबेल्ट सेन्सर, ब्रिथलायझर, ह्रदय ठोके मोजणे अशा सुविधा आहेत. ही माहिती सीपीयूमध्ये संग्रहित होते. त्याबाबतचे वेळोवेळी अलर्ट संबंधित यंत्रणेला देण्यात येतात.