वर्धा- लॉकडाऊनच्या काळात आलेले वीज बिल हे सामान्य नागरिकांना आर्थिक अडचणीचे ठरत आहे. वीज बिल माफीची मागणी जोर धरत असताना आर्वी तहसील कार्यालय परिसरात युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. यावेळी नारेबाजी करत वीज बिलाची होळी करण्यात आली. यावेळी पूर्ण बिल एकाच वेळी भरताना दोन टक्के सूट देण्यात आली आहे. मात्र, ही सूट नसून सामान्य नागरिकांची थट्टा असल्याचा आरोप युवा स्वाभिमान पक्षाने केला आहे.
आर्वी येथे वाढीव वीजबिल विरोधात सर्वपक्षीय लोकांनी एकत्र येत कृती समिती तयार केली. समितीच्या वतीने 29 मार्चला सरसकट वीज बिल माफ करावे, असे निवेदन देण्यात आले. हे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत तसेच दुग्ध विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांना देण्यात आले. कुठलेच पाऊल उचलले गेले नसल्याने आज आठवण म्हणून पुन्हा निवेदन तहसीलदार विद्याधर चव्हाण यांना देण्यात आले. तसेच कार्यालय परिसरात आंदोलन व नारेबाजी करत वीज बिलाची होळी करण्यात आली.