नंदुरबार - जिल्ह्यात वरूणराजाने दमदार हजेरी लावली. या पहिल्या पावसामुळे शेतीशिवारांसह काही वसाहतींमधील घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले होते. नवापूर तालुक्यातील ईटवाई शिवारात शेतातील झाडाखाली उभ्या असलेल्या एकाच्या अंगावर वीज पडल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला. यामुळे पहिल्या पावसाचा पहिला बळी गेला आहे. तर जिल्ह्यात 24 तासात 247 मि.मी. इतका पाऊस झाला असून आतापर्यंत जिल्ह्यात 41.16 टक्के पावसाची नोंद झाली आहे.
ईटवाई येथील कमलेश बालाजी गावित (वय 18) हा युवक शेतात गेला होता. यावेळी मुसळधार पाऊस होत असल्याने तो शेतातील वडाच्या झाडाखाली उभा होता. यावेळी वीज अंगावर पडल्याने कमलेशचा मृत्यू झाला आहे. याबाबत बालाजी दावा गावित यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात माहिती दिली असून त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेड कॉन्स्टेबल चौरे करित आहेत.