नागपूर - महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर शहरात (Nagpur Year Ender 2021) वर्षभरात बरेच राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. तसेच राजकीय घडामोडी (Nagpur Political News) आणि क्राईम कॅपिटल (Nagpur Crime Capital) असलेली ओळख या वर्षांतही कायम राहिली. कोरोनाची दुसरी लाट अनेक दुःखद अनुभवांची शिदोरी आणि शिकवण देऊन गेली आहे. 2021 सरत्या वर्षात (Year Ender 2021) काही तास राहिले असून, नववर्षाचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. पण सरत्या वर्षात आपण काय मागे सोडून नवीन आयुष्याकडे वाटचाल करत आहोत याचा आढावा 'ई टीव्ही भारत'च्या या विशेष रिपोर्टमधून घेऊयात...
- अनिल देशमुख, ईडी आणि बरंच काही :नागपूर जिल्ह्यात सर्वात मोठी राजकीय घडामोड ठरली ती म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची. या घटनेने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे तत्कालीन पोलीस कमिशनर परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटी वसुलीच्या आरोपाने खळबळ उडाली होती. त्यानंतर चौकशीचा ससेमिरा अनिल देशमुख यांच्या मागे लागला. नागपूरच्या निवासस्थानी 25 जूनला पीपीई किट घालून ईडीचे पाच अधिकारी पोहचले. जवळपास 9 तास चाललेल्या चौकशीत कुटुंबियांची विचारपूस झाली. त्यानंतर सीबीआय आणि इन्कम टॅक्स विभागांकडून छापेमारी करण्यात आली. काटोल येथील त्यांच्या निवासस्थानी तसेच फेट्री येथील साई शिक्षण संस्थेच्या एनआयटी कॉलेजवर छापा टाकून कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. दरम्यान, गृहमंत्री पदाचा राजीनामा, ईडीची नोटीस आणि ईडीसमोर हजर होऊन अटक अशा घडामोडींनी उपराजधानी नागपूरचे राजकारण ढवळून निघाले.
- नागपूर खंडपीठाचे निकाल आणि चर्चा :मुंबई उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाच्या स्किनला स्पर्श झाल्याशिवाय पॉस्को अंतर्गत लैंगिक शोषण होणार नाही असा निर्वाळा दिला होता. यामुळे वादग्रस्त निकालावर बरीच चर्चा झाली. हा निकाल न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाल यांनी दिला होता. हा निकाल 27 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी विवादास्पद निकाल रोखला होता. त्यानंतर अल्पवयीन मुलीचा हात पकडून पॅन्टची चेन खोलने हे सुद्धा कायद्याने गुन्हा ठरणार नाही हा निकालसुद्धा चर्चेत राहिला. हा निकालसुद्धा न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाल यांच्या बेंचने दिला होता.
- एकाच रात्रीत 5 जणांची हत्या :नागपूरच्या पाचपवली भागात कुटुंबातील पाच जणांची हत्या करत स्वतः आत्महत्या केली. त्यानंतर आलोक मातूरकरचे मेव्हणीसोबत प्रेम संबंध होते. पण ती टाळटाळ करत असल्याने आरोपीने एका रात्रीत तिची हत्या केली. हत्या करताना सासूला दिसल्याने तिचीही हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतःच्या पत्नीला, लहान मुलगा आणि मुलीची हत्या केली. या घटनेने नागपूर हादरले होते.
- म्यूकरमायकोसिसने दिसनं झाल धूसर :नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत म्युकरमायकोसिस सुरू झाला, पण निदान न झाल्याने तोपर्यंत दुसरी लाट आली. यात निदानासाठी लाखो रुपये खर्च झाले. दरम्यान, यावेळी 13 शस्त्रक्रिया झाल्यात. यात नवीन पॉल यांचा एक डोळा आणि जबड्याचा भाग काढावा लागला. हजारो रुपयांचे इंजेक्शन घेत उपचारावर तब्बल त्यांना दीड कोटी रुपयांचा खर्च लागला. अखेर उपचार झाला, पण निदान होण्यासाठी झालेल्या विलंबनाने एक डोळा गमवावा लागला. हे त्यांच्या कुटुंबियांसाठी फारच दुःखद होते.
- कोरोना मृत्यूने दिवसाला शंभरी गाठली :नागपूर जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाची लाट इतकी भयाणक राहिली की अनेकांनी आप्तस्वकीयांना गमावले. सुरुवातीला एका दिवसात 99 जणांचा तर लगेच त्यानंतर 112 जणांचा मृत्यू असा विक्रम ठरला. तेच दररोज सहा ते सात हजार रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह मिळत असल्यानें भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. रोज स्मशान घाटात अंत्यसंस्कारासाठी जागा अपुरी पडू लागली.
- मोहन भागवत यांना कोरोना आणि डिस्चार्ज :सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाल्याचे 10 एप्रिल रोजी समोर आले. त्यांना नागपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याने त्यांना सात दिवसांनी सुट्टी देण्यात आली.
- गतिमंद मुलीवर बलात्कार :नागपूर क्राईम कॅपिटल अशी ओळख असणाऱया शहरात एकाच रात्री सहा जणांनी अल्पवयीन गतिमंद मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. यामध्ये मदतीच्या नावाखाली तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली. तसेच तिच्या अज्ञानतेचा फायदा घेऊन आरोपी ऑटोचालकाने आणि त्याच्या मित्रांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नागपुरात 29 जुलै 2021 रोजी घडली होती.
- विधान परिषद निवडणूक 2021 :नोव्हेंबर महिन्यात नागपुरात धक्कादायक ठरणारी स्थानिक स्वराज्य संस्थेतील विधान परिषद निवडणूक जाहीर झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत लहानाचे मोठे झालेले छोटू भोयर यांनी भाजपला सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी भोयर यांना उमेदवारी जाहीर झाली. तर दुसरीकडे विधान परिषदेसाठी दिल्लीतील नाराज भाजप हायकमांडची नाराजी दूर करण्यास यशस्वी झाल्याने भाजपचे ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली.
- ऐनवेळी बदलला काँग्रेसचा उमेदवार :यात विधानपरिषदेच्या मतदानाला अवघे 12 तास शिल्लक राहिले असताना काँग्रेसचा उमेदवार बदलवण्याची नामुष्की ओढावली. यात अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना लॉटरी लागली. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार छोटू भोयर यांच्या ऐवजी अपक्ष मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर झाला. वोटिंग मशीनवर काँग्रेसचे चिन्ह असताना अपक्षाच्या चिन्हावर मतदान करावे लागले. तेच भाजपकडे मताधिक्य होतेच पण महाविकास आघाडीचे मत फोडून चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजय मिळवत आमदार झाले. विधानसभा निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारून साईडला केल्यानंतर पुन्हा आमदार करत बावनकुळे यांना प्रवाहात आणले.
- या प्रकरणात संपूर्ण नागपूर पोलीस लागले होते कामाला :नागपुरात प्रेमासाठी काही पण म्हणत चक्क बलात्कार झाल्याची खोटी तक्रार केल्याचे समोर आले. यामध्ये युवतीच्या कुटुंबियांनी प्रियकरासोबत लग्नासाठी विरोध केल्याने अपहरण करून बलात्कार केल्याची तक्रार नोंदवली. यात पोलिसांनी तब्बल 250 सीसीटीव्ही तपासले. यात 10 पोलीस उपायुक्त, एक हजार पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी कामाला लावल्यानंतर चौकशीत धक्कादायक बाब समोर आली. तरुणीचे दुसऱ्या धर्माच्या मुलांसोबत प्रेम असल्याने विरोध केला. त्यामुळे जर बलात्कार झाला तर बदनामी होईल आणि विवाह होणार नाही. शेवटी नाईलाजामुळे प्रियकरासोबत कुटुंबियांना लग्न करून द्यावे लागेल म्हणून तिने खोट्या बलात्काराची तक्रार केली.
- एका क्लिकवर वाचा Year Ender 2021 -
Parbhani Year Ender 2021 : वर्षभरातील 'या' घटनांमुळे परभणी जिल्हा राहिला चर्चेत!
Year Ender 2021: रणबीर-आलियासह बॉलिवूडच्या अविवाहित जोडप्यांचे मालदीव प्रेम