सातारा- राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील यांनी आज पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. साताराच्या जनतेने खासदारांवर टाकलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्यासाठी त्यांच्यासाेबत पूर्ण वेळ कार्यरत राहण्याचा निर्धार सांरग यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत व्यक्त केला. दरम्यान आपल्या निर्णायबाबत पक्षश्रेष्ठींना कळविल्याचे त्यांनी नमूद केले.
पाटील म्हणाले, पुणे पदवीधर मतदारसंघात उच्चांकी मतदार नोंदणी आपण केली आहे. ऑफलाईन व ऑनलाईन नोंदणीत आपणच अव्वल क्रमांकावर आहोत. मात्र पुणे पदवीधर मतदार संघातून निवडणूक न लढविण्याचा निर्णय मी घेतला आहे. त्याबाबत 10 जुलै रोजीच निर्णय झाला आहे. त्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही कळविलेले आहे. कोरोनाची स्थिती पाहता अधिक काळ ताटकळत राहण्यापेक्षा सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी खासदार पाटील यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी त्यांचा मुलगा व राष्ट्रवादीचा पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार आहे, असे सारंग पाटील यांनी सांगितले.