वाशिम- जिल्ह्यात यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील मानोरा, मंगरूळपीर, कारंजा तालुक्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र पेरणीनंतर बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. कृषी विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून संबंधित बियाणे कंपनीवर कारवाई करावी व शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
सोयाबीन उगवली नसल्याने वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट - Mahabeej Washim
पेरणी झाल्यानंतर आलेला जोरदार पाऊस, तसेच बियाण्यांची उगवणक्षमता कमी असणे, या कारणांमुळे हा प्रकार घडल्याचे प्राथमिक माहितीवरून कळले आहे. दरम्यान, महाबीजकडेही अशा तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापकांनी दिली आहे.

जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून खरीप पेरणीला सुरुवात झाली. त्या काळात झालेल्या पावसामुळे काही शेतात शेतकऱ्यांनी पेरणी केलेले सोयाबीन उगवले. परंतु गत आठवडाभरात पेरणी केलेले बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवलेच नसल्याचा प्रकार आता उघडकीस येत आहे. पेरणीत महाबीजसह इतर खासगी कंपन्या आणि घरगुती बियाण्यांचाही समावेश असल्याचे समजले आहे. जिल्ह्यातील कारंजा, मंगरुळपीर, मानोरा या तीन तालुक्यांमध्ये हा प्रकार अधिक प्रमाणात घडला असल्याचे प्राथमिक माहितीवरून दिसत असले तरी जिल्ह्यातील इतरही तालुक्यांमध्ये हा प्रकार घडला आहे.
याबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तालुका कृषी विभागासह पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. पेरणी झाल्यानंतर आलेला जोरदार पाऊस, तसेच बियाण्यांची उगवणक्षमता कमी असणे, या कारणांमुळे हा प्रकार घडल्याचे प्राथमिक माहितीवरून कळले आहे. दरम्यान, महाबीजकडेही अशा तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापकांनी दिली आहे.