सांगली -आमदार सुधीर गाडगीळ यांच्या अंजली फाउंडेशन कडून सांगलीच्या शासकीय रुग्णालयाला तीन व्हेंटिलेटर भेट देण्यात आले आहेत. त्यामुळे आता सांगलीच्या शासकीय रुग्णालयात ९ व्हेंटिलेटरची व्यवस्था झाली आहे.
पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय हे सांगली, कोल्हापूर, सातारा आणि दक्षिण कर्नाटक राज्यातील अनेकांसाठी वरदान आहेत. मोठ्या प्रमाणात गरजू रुग्ण उपचारासाठी या रूग्णालयात येत असतात. येथे येणाऱ्या रूग्णांना चांगली सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी विविध माध्यमातून समितीच्या शासकीय रुग्णालयाला साधन सामग्री उपलब्ध करून देण्याचे काम करत आहेत .
आमदार गाडगीळ यांच्या अंजली फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णालयाला तीन नवीन व्हेंटिलेटर भेट म्हणून देण्यात आले आहेत. मंगळवारी रुग्णालयात गाडगीळ यांच्या उपस्थितीत हे व्हेंटिलेटर्स रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी अंजली फौंडेशनचे ट्रस्टी सिद्धार्ध गाडगीळ, महापौर गीता सुतार, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, सरचिटणीस शरद नलवडे, गणपतराव साळुंखे, अतुल माने आदी उपस्थित होते. यावेळी गाडगीळ यांनी बोलताना सांगलीच्या शासकिय रुग्णालयात येणाऱ्या रूग्णांवर योग्य आणि तातडीने उपचार व्हावेत, यासाठी रूग्णालयाला आवश्यक ती सर्व मदत करणार असल्याचे सांगितले. तसेच अंजली फाउंडेशन, महाबळ मेटल प्रायव्हेट लिमिटेड आणि जीवनज्योत कॅन्सर रिलीफ ट्रस्ट मुंबईच्या माध्यमातून हे व्हेंटिलेटर्स शासकिय रुग्णालयाला दिले आहेत. याशिवाय आमदार फंडातूनही आणखी तीन व्हेंटिलेटर्स देणार आहे. याचा रुग्णांना चांगला फायदा होईल, असे मत यावेळी आमदार गाडगीळ यांनी व्यक्त केले.