उदगीर (लातूर) - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक असलेला उदगीर तालुका कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत आहे. शनिवारी एकाच दिवशी येथील सामान्य रुग्णालयातून 11 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर आता तालुक्यात फक्त एका रुग्णावर उपचार सुरू आहेत. या रुग्णाचीही प्रकृती ठणठणीत असून दोन दिवसांनी त्यालाही घरी सोडण्यात येणार आहे.
उदगीर तालुका कोरोनामुक्तीकडे ; फक्त एका कोरोना रूग्णावर उपचार सुरू
उदगीर तालुक्यात आतापर्यंत 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र, रुग्णांची संख्या वाढत असतानाही दुसरीकडे सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या घटत होती. तर उपचार घेऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत होती.
निलंगा पाठोपाठ उदगीर शहरात सुरवातीला कोरोनाचे रुग्ण आढळले होते. यामध्येच एका 70 वर्षीय महिलेला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. या रूग्णाचा त्याच दिवशी मृत्यू झाला होता. त्यामुळे जिल्हाभर चिंतेचे वातावरण होते. शिवाय दिवसेंदिवस रुग्णांची संख्याही वाढत वाढत 60 वर गेली होती. तर आतापर्यंत तालुक्यात 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र, रुग्णांची संख्या वाढत असतानाही दुसरीकडे सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या घटत होती. तर उपचार घेऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत होती.
दरम्यान, शनिवारी एकाच दिवशी 11 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या केवळ एकात रुग्णावर उपचार सुरू आहेत. याकरीता आरोग्य विभागातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश हरिदास, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शशिकांत देशपांडे यांचे मोठे योगदान राहिले असल्याचे उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी सांगितले. यामध्ये तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी भरत राठोड यांचीही महत्वाची भूमिका राहिली आहे. त्यामुळे उदगीर तालुका कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत असला तरी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.