जालना - जिल्ह्यामध्ये कोरोनाचे उपचार घेत असलेल्या २ रुग्णांचा आज (मंगळवार) सकाळी मृत्यू झाला आहे. त्यामुळे हा आकडा आता १३ वरून १५ वर गेला आहे. जालना शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासन दिवसेंदिवस नवीन उपाययोजना करत आहे. मात्र, आता कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येसोबतच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही वाढल्याने जालनेकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
जालन्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू; एकूण आकडा 15 वर
जिल्ह्यात आज दोन कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे, जिल्ह्यातील कोरोना मृत्यूंची संख्या ही १३ वरून १५ वर जाऊन पोहोचली आहे. मृत झालेले दोन्ही रुग्ण जालना शहरातील होते.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. यातच आज दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने, मृतांची संख्याही १५ वर पोहोचली आहे. मृत झालेले दोन्ही रुग्ण जालना शहरातील आहेत. त्यापैकी एक मंठा चौफुली परिसरातील 85 वर्षीय वृद्ध आहेत. ते 27 जूनरोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. तर नरीमान नगर येथील एक 55 वर्षीय व्यक्ती दिनांक 28 जूनरोजी उपचारासाठी दाखल झाले होते. दोघेही शेवटच्या टप्प्यात उपचारासाठी दाखल झाल्यामुळे त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही. यापैकी नरीमान नगर मधील रुग्णाला अर्धांगवायूचा आजार होता आणि उपचारासाठी त्यांना उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहितीही सरकारी सूत्रांनी दिली आहे.
नवीन आणि जुना जालना अशा दोन्ही भागातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने कालच कुंडलिका नदीवरील चारही पूल बंद केले होते. मात्र, नागरिकांनी यापैकी देहेडकर वाडी येथील पुलावरील बंद केलेला रस्ता नागरिकांनी स्वतःहून सुरू केला आहे. त्यामुळे प्रशासन देखील आता हतबल झाले आहे.