सातारा- गेल्या काही दिवसांपासून आसपासच्या वस्त्यांवर घुटमळलेला कोरोना आज थेट गोंदवल्याच्या मध्यवस्तीतच घुसला. लग्नाला जाऊन आलेल्या कुटुंबातील 2 जणांचा अहवाल कोरोनाबधित आल्याने आता सर्वांची चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे. बाधितांच्या निकट सहवासातील 5 जणांना आज विलगीकरणात पाठवण्यात आले असून आत्तापर्यंत वस्तीत 9 जण कोरोनाबधित आढळले आहेत.
कोरोना प्रादुर्भाव वाढत असतानाही गोंदवल्यात मात्र कडक उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु बाहेरून आलेल्यांपैकी एक महिला बाधित झाली होती. परंतु अल्पावधीतच ती बरी होऊन घरी परतल्यावर ग्रामस्थांना हायसे वाटले होते. त्यानंतर मात्र गावी येऊन गेलेल्या मुंबईकरासह पुण्यातील लग्नात हजर असणारे व त्यांच्या निकट सहवासात असलेल्यांपैकी 6 जण कोरोनाबाधित झाले. यातील दोघे जण बरे होऊन घरी परत आल्यानंतर आज आणखी 2 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये 75 वर्षीय पुरुष व 21 वर्षीय महिलेचा समावेश आहे.