गडचिरोली -विवाहित महिलेवर बलात्कार करणाऱ्या चार आरोपींना गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्षांचा सश्रम कारावास व प्रत्येकी ५५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. निखिल मंडल, राजेश डाकवा, महादेव बारई व स्वरुप मिस्री अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. बलात्काराची ही घटना २९ ऑगस्ट २०१८ मध्ये चामोर्शी येथे घडली होती.
विवाहिता बलात्कार प्रकरणी चार आरोपींना 20 वर्षे कारावास, गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल - Gadchiroli rape case news
चामोर्शी येथील पीडित महिला आपल्या पतीसह लालडोंगरी परिसरात काही कामानिमित्त जात असताना आरोपींनी तिच्यावर अत्याचार केला होता. या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने चार आरोपींना २० वर्षांचा सश्रम कारावास व प्रत्येकी ५५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
चामोर्शी येथील पीडित महिला आपल्या पतीसह लालडोंगरी परिसरात काही कामानिमित्त जात असताना आरोपींनी त्यांना वाटेत अडवत त्यांच्याशी गैरवर्तन केले होते. तसेच त्यांनी पती-पत्नीला मारहाण करुन त्यांचे फोटो काढले आणि चार हजार रुपयांची मागणी केली होती. पैसे न दिल्यास फोटो इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी दिली. यामुळे घाबरुन महिलेचा पती हा आरोपी निखिल मंडल व स्वरुप मिस्री यांच्यासह पैसे आणण्यासाठी घरी गेला. तेव्हा आरोपी राजेश डाकवा व महादेव बारई यांनी त्या महिलेला जंगलात नेत तिच्यावर बलात्कार केला. पैसे घेऊन परत आल्यानंतर आरोपी निखिल मंडल यानेही तिच्यावर बलात्कार केला होता. शिवाय तिच्या पतीकडुन पैसेही लुटले.
या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन चामोर्शी पोलिसांनी चारही आरोपींवर गुन्हा दाखल करुन अटक केली होती. पोलिस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे यांनी प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. तर या प्रकरणी सुनावणी सुरू असताना आज जिल्हा व सत्र न्यायालयाने साक्षदारांचे जबाब नोंदवून आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपींना भादंवि कलम ३२३ अन्वये प्रत्येकी १ वर्षाची शिक्षा, कलम ३८३ अन्वये ३ वर्षे शिक्षा आणि ४ हजार रुपये दंड, कलम ५०६ अन्वये प्रत्येकी २ वर्षांची शिक्षा व १ हजार रुपये दंड आणि कलम ३७६ अन्वये २० वर्षांचा सश्रम कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. शिवाय पीडितेला २ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेशही दिले. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अॅड.अनिल प्रधान यांनी काम पाहिले.