नांदेड - जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून बुधवारी २३ नवे रुग्ण आढळल्याने प्रशासनासोबतत नांदेडकरांचीही झोप उडाली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 175 वर पोहचली आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत 126 कोरोनाबाधित रूग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये फक्त 20 रुग्णांवर उपचार सुरु होते.
बुधवार हा दिवस प्रशासनासमोर कोरोनाचे नवे वादळ घेवून आला. सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात इतवारा भागातील १ महिला आणि मुखेड तालुक्यातील भेंडेगाव येथील १ युवक कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. मात्र, दुपारी मात्र २१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आढळून आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. तीन दिवसांपूर्वी नईआबादी येथील १ जण तर देगलूर नाका भागातील १ डॉक्टर आणि त्यांचा सेवक कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले होते. प्रशासनाने डॉक्टर आणि सेवक तसेच नईआबादी भागातील संबंधीत कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या नातेवाईक व संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल बुधवारी दुपारी प्रशासनाला प्राप्त झाला आहे. 132 अहवालांपैकी 21 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले. तर 99 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 6 जणांचे अनिर्णित तर 6 जणांचे अहवाल नाकारण्यात आले आहेत. 21 पैकी 11 कोरोनाबाधित रुग्ण देगलूरनाका भागातील आहेत.