परभणी - 'कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात जनता कर्फ्यूची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यापूर्वी संचारबंदीमुळे कोरोनाच्या प्रसाराला प्रतिबंध लावणे शक्य झाले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी स्वतः या संदर्भातील आदेश बजावून सर्व व्यवसाय आणि सेवांना 26 ते 30 सप्टेंबर असे 5 दिवस बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. अर्थात या जनता कर्फ्यू मधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
'लॉकडाउन'चा सुरुवातीचा दीड महिना एकही कोरोनाचा रुग्ण नसणाऱ्या परभणी जिल्ह्यात जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून 'कोरोना' चा संसर्ग प्रचंड झपाट्याने वाढत गेला. त्यानुसार सध्या परभणी जिल्ह्यातील कोरुना बाधितांची संख्या 5 हजाराच्या जवळपास पोहचली आहे, तर 200 हून अधिक कोरोनाबाधितांचे बळी गेले आहेत. कोरनाचा प्रसार पाहता त्याला रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करण्याची आवश्यकता असल्याची भावना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी व्यक्त केली आहे.
संसर्ग वाढत असतानाच नागरिक मात्र गरज नसताना घराबाहेर, बाजारपेठेत आणि इतरत्र फिरताना दिसत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढला असून याला आता प्रतिबंध करण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे 'जनता कर्फ्यू' ही संकल्पना शंभर टक्के अंमलात आणून ती यशस्वी करणे आवश्यक असल्याचेही मुगळीकर म्हणाले.