नवी मुंबई -दिवसेंदिवस नवी मुंबईमध्ये कोरोनाचा कहर वाढत आहे. आज (सोमवारी) 88 नव्या कोरोना रुग्णांची नवी मुंबईमध्ये नोंद झाली. तर आज 40 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. कोरोनामुळे 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या पाहता नवी मुंबई शहराने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सद्यस्थितीत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत असून कोरोनाबाधितांच्या संख्येत मात्र झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र नवी मुंबई शहरात दिसत आहे.
वाढती रुग्णसंख्या रोखण्यास प्रशासनाला फारसे यश येत नसल्यानेचेही दिसून येत आहे. तसेच सद्यस्थितीत कोरोनाच्या रुग्णांसाठी रुग्णालयेही कमी पडत आहे. त्यामुळे वाशीमधील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये 1100 बेडचे तात्पुरते कोविड रुग्णालय उभारण्यात येत आहे. या रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याचे प्रशासनाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे.
नवी मुंबईत आत्तापर्यंत 2985 कोरोनाबाधित आढळून आले असून त्यापैकी 11 रुग्ण हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. आत्तापर्यंत नवी मुंबईत 13529 लोकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 10160 जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर 396 जणांचे तपासणी अहवाल येणे बाकी आहे. नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2974 इतकी आहे. त्यात सोमवारी 88 रूग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये तुर्भेमधील 13, बेलापूरमधील 10, कोपरखैरणेमधील 11, नेरुळमधील 17, वाशीतील 15, घणसोलीमधील 11, ऐरोलीमधील 10, दिघा 1 असे एकूण 88 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
यामध्ये 28 स्त्रिया आणि 60 पुरुषांचा समावेश आहे. आतापर्यंत नवी मुंबईत 1758 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आज (सोमवारी) बेलापूरमधील 4, नेरुळमधील 1, तुर्भेमधील 7, वाशीमधील 5, कोपरखैरणेमधील 12, घणसोलीमधील 4, ऐरोलीमधील 7 अशा एकूण 40 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये 14 स्त्रिया आणि 26 पुरुषांचा समावेश आहे. शहरात 1124 रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 92 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून सोमवारी तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.