मुंबई- भारतात रोज 35 ते 40 हजार कोरोना रुग्ण आढळत आहेत. तर 11 लाख लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली असून अनेक रुग्ण कुणाच्याही संपर्कात आलेले नसतानाही त्यांना कोरोना झाल्याची उदाहरणे समोर येत आहेत. त्यामुळे भारत आता तिसऱ्या टप्प्यात असून भारतात समूह संसर्गाला सुरुवात झाल्याचा दावा इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने केला आहे. मात्र हा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयासह आयसीएमआरने फेटाळून लावला आहे. मात्र त्यानंतरही आयएमए आपल्या दाव्यावर ठाम असून आरोग्य मंत्रालय ही बाब का मान्य करत नाही, हा प्रश्नच असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता या विषयावरून आयएमए आणि आरोग्य मंत्रालय-आयसीएमआर यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे.
आयएमएच्या भारतीय रुग्णालय मंडळाचे अध्यक्ष डॉ व्ही. के. मोंगा यांनी भारतात समूह संसर्ग अर्थात कम्युनिटी स्प्रेड सुरू झाल्याचा दावा नुकताच केला आहे. भारतात दररोज वाढणारी रुग्ण संख्या पाहता हा दावा त्यांनी केला आहे. पण या दाव्यावरून आता वाद रंगला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआरने हा दावा फेटाळून लावला आहे. मात्र यानंतरही आयएमए आपल्या दाव्यावर ठाम आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली आणि गुजरातसह अन्य राज्यात रुग्ण संख्या वाढत आहे. देशात 35 ते 40 हजार रुग्ण दररोज आढळत आहेत, तेव्हा समूह संसर्गाची शक्यता नाकारणे हे देशाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमेचा विचार करता योग्य नसल्याचे मत आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले आहे.
आज असे कित्येक पॉझिटिव्ह रुग्ण आहेत की जे कुणाच्या संपर्कात आले हे शोधताच येत नाही. तर गेली 4 महिने घरात बसलेल्यांनाही आता कोरोना होत आहे. ते कुणाच्या संपर्कात आले हेही समजत नाही. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यात भारत आहे, यावर आयएमए ठाम आहे, असेही डॉ. भोंडवे यांनी सांगितले.
आयएमएचे सदस्य आणि महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनीही भारतात समूह संसर्गाची सुरवात झाल्याचे नाकारता येत नाही, अशी प्रतिक्रिया 'ईटीव्ही भारत' ला दिली आहे. 11 लाख रुग्ण झाले असतानाही शक्यता आपण का नाकारत आहोत, हा प्रश्न आहे. आमच्याकडे आता संपर्कात न आलेले रुग्ण येत आहेत. रुग्णवाढीचा दर वाढत आहे. तेव्हा हे समूह संसर्ग सुरू झाल्याचे लक्षणे नाही का, असा सवाल डॉ. उत्तुरे यांनी केला आहे.
आयएमए आपल्या भूमिकेवर ठाम असताना राज्याच्या टास्क फोर्सने मात्र सावध भूमिका घेतली आहे. टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी समूह संसर्ग अर्थात कम्युनिटी स्प्रेड असे थेट म्हणता येणार नाही, पण भारतात अनेक ठिकाणी लोकॅलिटी कम्युनिटी स्प्रेड झाल्याचे मात्र नाकारता येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज्याचा विचार करता मुंबई, ठाणे, पुणे अशा ठिकाणी लोकॅलिटी कम्युनिटी स्प्रेड दिसून येत आहे. त्याला काही जण कम्युनिटी स्प्रेड म्हणत आहेत. पण थेट अजून तरी असे म्हणता येणार नाही. कारण देशाची एकूण लोकसंख्या विचारात घेता 11 लाख हा आकडा कम्युनिटी स्प्रेड दर्शवणारा आहे असेही नाही, असे डॉ. जोशी यांचे मत आहे. एकूणच आयएमए समूह संसर्गाचा दावा करत असताना सरकारी पातळीवर मात्र ही बाब फेटाळून लावली जात आहे, हे मात्र नक्की.