सटाणा (नाशिक)- देशाला कोट्यावधी रुपयांचे परकीय चलन मिळवून देणाऱ्या अर्ली द्राक्ष पिकाचे शासकीय पातळीवर निर्यात धोरण निश्चित व्हावे, जेणेकरून शेतकऱ्यांना द्राक्ष छाटणीचे नियोजन करता येईल, अशी आग्रही मागणी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. या मागणीची तात्काळ दखल घेत निर्यात धोरण ठरविण्यासाठी लवकरच निर्यातदार व द्राक्ष उत्पादकांची संयुक्त बैठक घेण्याच्या सूचना कृषी मंत्री दादा भुसे यांनी राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांना दिल्या आहेत.
जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव, देवळा, कळवण या भागात देशाला कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन मिळवून देणाऱ्या अर्ली द्राक्ष हंगाम उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. मात्र कोरोना सारख्या महाभयंकर संकटाच्या पार्श्वभूमीवर द्राक्ष निर्यातीला अडचणी येऊ नये म्हणून निर्यात धोरण ठरविणे आवश्यक असल्याने त्या संदर्भात बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी भुसे यांनी राज्याचे कृषी सचिव डवले यांना उपरोक्त सूचना केल्या.
नाशिक जिल्ह्यात कसमादे पट्टयात उत्पादन घेतले जाणारे अर्ली द्राक्ष पीक पूर्णपणे आखाती व युरोप देशात निर्यात केले जाते. या निर्यातीतून देशाला परकीय चलन तर मिळतेच सोबतच बेरोजगारांना रोजगार मिळतो. औषध व खत विक्रेते, निर्यात कंपन्या देखील याच्यावर अवलंबून आहेत. मात्र कोरोनाच्या संकटामुळे निर्यात अडचणीत येऊन द्राक्ष उत्पादकांची कोट्यवधीची गुंतवणूक वाया जाऊ नये म्हणून शासकीय पातळीवर निर्यात धोरण निश्चित व्हावे जेणेकरून शेतकऱ्यांना द्राक्ष छाटणीचे नियोजन करता येईल, अशी आग्रही मागणी आमदार बोरसे यांनी केली. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत कृषी मंत्री भुसे यांनी तत्काळ राज्याचे कृषी सचिव डवले यांच्याशी दुरध्वनीवर संपर्क साधून निर्यातदार शेतकरी व अधिकारी यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
सचिव डवले यांनी येत्या आठवड्यात बैठकीचे आयोजन करून अर्ली द्राक्ष निर्यातीबाबत ठोस असे धोरण राबविण्याबाबत उपाययोजना करण्यात येतील, असे स्पष्ट केले. यावेळी आमदार बोरसे यांनी बागलाण तालुक्यात रासायनिक खतांचा तुडवडा होत असल्याचे गाऱ्हाणे कृषी मंत्री भुसे यांच्याकडे मांडले. त्यांनी तत्काळ कृषी अधीक्षकांशी संपर्क साधून मुबलक प्रमाणात रासायनिक खते उपलब्ध करून देण्याच्या सूचना करताना साठेबाजी करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश यावेळी दिले.
याप्रसंगी सटाणा बाजार समितीचे संचालक पंकज ठाकरे, जिल्हापरिषदचे माजी सदस्य पप्पूतात्या बच्छाव, द्राक्ष उत्पादक डॉ. मुरलीधर पवार, हेमंत पवार, अमोल पवार, विनोद अहिरे, मुन्ना भामरे आदी उपस्थित होते.