महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 29, 2020, 2:06 PM IST

Updated : May 29, 2020, 4:07 PM IST

ETV Bharat / briefs

मेंदूवर शस्त्रक्रिया झालेल्या दीड महिन्याच्या बाळाची कोरोनावर मात

10 दिवसांच्या उपचारानंतर हे बाळ आता बरे झाले आहे. त्याने कोरोनावरही मात केली आहे. त्यामुळे त्याला आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. भूलतज्ज्ञ डॉ. क्षितिजाही गेल्या 10 दिवसापासून क्वारंटाइन असून त्यांचा एक रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, हीदेखील आनंदाची बाब आहे.

बाळाची कॊरोनावर मात
बाळाची कॊरोनावर मात

मुंबई - कोरोनाच्या नकारात्मक वातावरणात एक अत्यंत पॉझिटिव्ह बातमी मुंबईकरांसाठी आहे. मध्यरात्री तीन वाजता तातडीने ज्या दीड महिन्याच्या बाळाच्या मेंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्या बळाने अखेर कोरोनावर मात केली आहे. बाळाचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आज त्याला डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती सायनमधील डॉक्टरांनी दिली असून यावर आनंद आणि समाधान व्यक्त केले आहे. हे बाळ अत्यंत नाजूक परिस्थितीत कोरोनावर मात करणारा सर्वात लहान आणि पहिला कोरोना योद्धा ठरले आहे.

13 मे ला सायनमध्ये दीड महिन्याच्या बाळाला दाखल करण्यात आले. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान 17 मे ला या बाळाची प्रकृती खालावली. सिटीस्कॅनमध्ये त्याच्या मेंदूत रक्ताच्या गाठी तयार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तत्काळ त्याची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. 18 मेच्या मध्यरात्री 3 वाजता शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळी 6 वाजता शस्त्रक्रिया संपली. पण या शस्त्रक्रियेदरम्यान एक अंगावर काटा आणणारी घटनाही घडली होती, ती म्हणजे या बाळाच्या श्वासनलिकेत ट्युब टाकण्यासाठी भूलतज्ज्ञ डॉ. क्षितिजा नीरज महाजन यांनी फेसशिल्ड, आय गॉगल आणि चष्मा काढून त्याच्या तोंडाच्या अगदी जवळ जाऊन ट्युब टाकली होती. संसर्ग होण्याची भीती असतानाही डॉक्टर म्हणून बाळाचा जीव वाचवणे महत्त्वाचे मानत त्यांनी धाडस केले. त्यामुळेच शस्त्रक्रिया करता आली आणि ती यशस्वीही झाली.

आज 10 दिवसाच्या उपचारानंतर हे बाळ आता बरे झाले आहे. त्याने कोरोनावरही मात केली आहे. त्यामुळे त्याला आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, ज्या डॉ. क्षितिजा यांनी बाळासाठी धाडस केले होते, त्यांनी बाळाला डिस्चार्ज मिळत असल्याने आनंद व्यक्त केला आहे. त्या गेल्या 10 दिवसापासून क्वारंटाइन असून त्यांचा एक रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे हीदेखील आनंदाची बाब आहे.

Last Updated : May 29, 2020, 4:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details