ठाणे- संपूर्ण देशात कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे जनता हैराण झाली असताना आता मागील काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगणाला भिडू लागले आहेत. त्यामुळे वाढत्या अन्यायकारक दरांबाबत शहर काँग्रेसच्या वतीने सोमवारी केंद्र सरकाराच्या निषेधार्त धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी हे आंदोलन करून ही दरवाढ रद्द करावी, अशा आशयाचे निवेदन काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
केंद्र सरकाराने पेट्रोल डीझेलची दरवाढ रद्द करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार व ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष अँड. विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजप सरकाराने घेतलेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात शहर मध्यवर्ती काँग्रेस कार्यालय परिसर, स्टेशन रोड ठाणे येथे आंदोलन घेण्यात आले. या प्रसंगी काँग्रेस नेते रविंद्र आंग्रे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे, काँग्रेसचे माजी गटनेते संजय घाडीगावकर, सेवादल काँग्रेस अध्यक्ष शेखर पाटील, आशिष दूबे, सन्नी थाॅमस आदी पदाधिकारी उपस्थित होते.