नागपूर - कोविड-१९ विषाणूशी लढणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी टाटा ट्रस्टतर्फे मनपाला कोव्हिड रिलीफ साहित्य प्रदान करण्यात आले. टाटा ट्रस्टच्या वतीने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना साहित्य सोपविण्यात आले. या साहित्यामध्ये सात हजार लिटर सॅनिटायझर, तीन हजार पीपीई कीट, सहा हजार एन-९५ मास्क यांचा समावेश आहे.
मदतीचा हात; टाटा ट्रस्टकडून मनपाला कोविड रिलीफ साहित्य प्रदान - टाटा ट्रस्ट अपडेट न्यूज
नागपूर शहरात कोरोनाचा संसर्ग पसरल्याने नागरिक धास्तावले आहेत. शहरातील कोरोनाला रोखण्यासाठी अनेक दानशूर पुढे येत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी टाटा ट्रस्टने हातभार लावला आहे. ट्रस्टने महापालिकेला मदत केली आहे.
![मदतीचा हात; टाटा ट्रस्टकडून मनपाला कोविड रिलीफ साहित्य प्रदान Tata trust](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-04:04:53:1597487693-mh-ngp-05-tata-trust-materials-for-covid-worrior-7204462-15082020151421-1508f-1597484661-935.jpg)
नागपूर महापालिकेच्या वतीने कोव्हिड-१९ विषाणूचे संक्रमण थांबविण्याच्या दृष्टीने आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नात अनेक संस्था हातभार लावत आहेत. नागपूर महापालिकेसोबत झालेल्या करारानुसार टाटा ट्रस्ट नागपुरातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांचे अधिक बळकटीकरण करण्यासाठी कार्यरत आहे.
सध्या कोरोना महामारीचा काळ सुरू असल्यामुळे नागपूर महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेसोबत टाटा ट्रस्टची संपूर्ण चमू कार्यरत आहे. कोव्हिडविरुद्धच्या लढाईत टाटा ट्रस्टचे सर्व सहकारी विविध कार्यात सहभागी आहेत. टाटा ट्रस्टने कोरोना योद्ध्यांसाठी घेतलेला पुढाकार हा निश्चितच समाजाप्रती असलेले दायित्व निभावणारा असल्याचे प्रतिपादन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.