नवी दिल्ली -दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारासाठी जबाबदार धरत, दिल्ली पोलिसांनी आम आदमी पक्षाचा निलंबित नेता ताहिर हुसेन याच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. जानेवारी महिन्यात हुसेनने दंगल करण्यासाठी स्थानिक रहिवाशाला पैसे दिल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. फेब्रुवारीमध्ये झालेल्या एका स्थानिक रहिवाशाच्या हत्येसंदर्भात दिल्ली पोलिसांनी सोमवारी न्या. राकेश कुमार रामपुरी यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. हुसेन आणि त्याचा भाऊ आलम, गुलफाम, तन्वीर यांच्यासह एकूण आठ जणांविरोधात आरोपपत्र दाखले केले.
ताहिरच्या सांगण्यावरून गुलफामने खरेदी केल्या 100 गोळ्या -
पोलिसांच्या सांगण्यानुसार, दिल्लीतील दंगलीदरम्यान बंदुकीच्या 200 गोळ्यांमधील जास्तीत जास्त गोळ्या या ताहिर हुसेनचा भाऊ गुलफाने झाडल्या आहेत. तसेच दंगलीत त्याच्याकडून सात काडतुसेसुद्धा मिळाली. ही मोठ्या प्रमाणावर दंगल घडवण्याची तयारी असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. 31 जानेवारीला गुलफामने 100 गोळ्या खरेदी केल्या असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. तसेच ताहिरने गुलफामला शस्त्र खरेदी करण्यासाठी 15 हजार रुपये दिले असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
दंगलीमध्ये जखमी झालेल्या व्यक्तीने केलेल्या तक्रारीवरून आरोपींना अटक करण्यात आली आहे. तक्रारदार गोस्वामी यांनी तक्रारीत म्हटले आहे की, हुसेन आणि गुलफाम यांनी गोळीबार केला. कलम 307, 120 ब आणि कलम 34 नुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.