सोलापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरातील रेल्वेची प्रवासी सेवा बंद करण्यात आली होती.या दरम्यान, काही मोजक्याच गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. परंतू दररोज सोलापूर मुंबई धावणारी सिद्धेश्वर एक्स्प्रेस बंद असल्याने अनेकांना ताटकळत बसावे लागले होते. आता येथील प्रवाशांची प्रतीक्षा संपली असुन, शुक्रवारपासून (9 ऑक्टोबर)पासून ही रेल्वे सुरू होणार आहे.
देशभरात टप्प्या-टप्प्याने विशेष प्रवासी एक्स्प्रेस गाड्या देशभरात धावू लागल्या आहेत. रेल्वेची परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने सोलापूर -मुंबई मार्गावर सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुपर फास्ट एक्स्प्रेस सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या वेळेत धावणार असल्याची माहिती रेल्वेचे अधिकारी गणेश कांबळे यांनी दिली. या गाडीचे स्थानकावरील थांबेसुद्धा पूर्वीप्रमाणे असतील. परंतु कर्जत, खंडाळा, लोणावळा, माढा, मोहोळ आणि भिगवण स्थानकांवर ही गाडी थांबणार नाही.
तर, मुंबईहुन सोलापूरकडे येणाऱ्या प्रवाशांनादेखील या एक्स्प्रेसचा लाभ घेता येणार आहे. गाडी क्र. 02115 छत्रपती शिवाजी महाराज ट्रर्मिनस (मुंबई) ते सोलापूर सुपरफास्ट विषेश एक्स्प्रेस शुक्रवारपासून सीएसएमटी स्थानकावरून धावणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेची नियमावली -
पुष्टीकृत (confirmed) तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश देण्यात येईल.
सर्व प्रवाशांची अनिवार्य तपासणी करण्यात येईल आणि केवळ लक्षणं नसलेल्या प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवेश करण्यास/बसण्यास परवानगी दिली जाईल.