समाज माध्यमे म्हणजेच सोशल मीडिया 21 व्या शतकात आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. फेसबुक, ट्विटर, यूट्युब, लिंक्डईन, व्हॉट्स अॅप सारख्या हजारो सोशल मीडिया साईट आणि अॅपने आपले दैनिंदिन जीवन वेढले गेले आहे. पण तुम्हाला कदाचित माहित नसेल, सोशल मीडिया डे दरवर्षी 30 जूनला साजरा केला जातो.
2010 साली प्रसिद्ध मॅशेबल या वेबसाईटने सोशल मीडिया डे ची संकल्पना मांडली. जागतिक संपर्कव्यवस्थेत सोशल मीडियाचे महत्त्व, त्याचा आपल्या जीवनावर झालेला परिणाम आणि जग जवळ आणण्यासाठी सोशल मीडियाचे योगदान या दिवशी सेलिब्रेट केले जाते. आपला मित्र परिवार, नातेवाईक, किंवा परदेशात असलेल्या एखाद्या अनोळखी व्यक्तीशी आपल्याला संपर्क साधता येतो. त्याच्यीशी मैत्री करता येते. ही ताकद सोशल मीडियात आहे.
1980-90 च्या दशकात इंटरेनेटचा विस्तार झाला. एकदम काही इंटरनेट सर्वांना उपलब्ध झाले नाही. सुरुवातीला विद्यापीठे आणि संशोधन संस्था, लष्कर यांच्यापुरते मर्यादीत असलेले इंटरनेटचे जाळे झपाट्याने विस्तारले. खासगी कंपन्या, व्यवसाय, शाळा महाविद्यालये, वैयक्तीक वापरासाठी इंटरनेट खुले झाले. सुरुवातीला फक्त सरकारांचे इंटरनेटवर नियंत्रण होते. मात्र, आता इंटरनेट सरकारच्या हातात राहीले नाही.
सोशल मीडियावर आपल्याला सहज व्यक्त होता येते. फक्त आपला मित्रपरिवार आणि ओळखीचे लोक नाही तर संपूर्ण जगासमोर आपल्याला व्यक्त होता यायला लागले. मग ते फेसबुक असो इन्स्टाग्राम किंवा युट्यूब. तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असाल तरी तुम्ही संपूर्ण जगाशी संपर्क साधू शकता. हे सोशल मीडियाने करुन दाखवलं, त्याआधी आपल्याला हे शक्य नव्हते. एखादया विषयावर तुमचे मत तुम्ही फक्त ओळखीच्या लोकांसमोर मांडू शकत होता. मात्र, आता सोशल मीडियाने संपूर्ण खेळच बदलून टाकला आहे. एक छोटीशी ठिगणी जशी वनवा पेटवते तसा कोणताही विषय जगभर चर्चिला जाऊ शकतो, ते फक्त सोशल मीडियामुळे.