अहमदनगर - श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील ओढ्यात अज्ञात व्यक्तीने मासे पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यामध्ये 25 ते 30 धामीण जातीचे साप आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे सर्व साप साधारणपणे 6 ते 7 फुट लांबीचे असून या सर्व सर्पांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
जाळ्यात अडकलेले हे सर्व साप रस्त्यावरूनच नागरिकांच्या निदर्शनास आल्याने ग्रामस्थांनी वनसंरक्षक विकास पवार यांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत पाहणी करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती कळवली. त्यानुसार वन विभागाचे अधिकारी यांनी मृत सापांपैकी 2 साप शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मसूद खान तसेच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट सहायक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांनी घटनास्थळी भेट देत घटनास्थळी पंचनामा केला. परिसरात मृत सापांचा वास येत असल्याने शासकीय अधिकाऱ्यांनी निर्णय घेत परिसरात जेसीबीच्या सहाय्याने खड्डा घेऊन सर्व सापावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी परिसरातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. याप्रसंगी येथील ग्रामस्थ ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य सचिन पवार, अविनाश पवार, गजानन कसार, प्रकाश गोसावी, दादा झिंज ग्रामपंचायत कर्मचारी रमेश राठोड, काळू साळवे तसेच वन कर्मचारी मदतनीस प्रकाश दौंड यांनी परिश्रम घेतले. शासकीय अधिकारी यांच्याकडून परिसरातील नागरिकांनी पाण्यासंदर्भात तसेच जनावरांना पाणी पिऊ न देण्याचे आवाहन केले आहे. पाण्यात जाळे लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा पोलीस प्रशासनाकडून तपास सुरू आहे.