ठाणे - हाथरस प्रकरणावरून शिवसेना आक्रमक झाली असून राज्यभरात आंदोलनं करण्यात येत आहेत. आज ठाण्यातही शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे उल्हासनगरमध्ये अनेक वर्षापासून हाथरस पीडितेचे सख्खे चुलते हे कुटंबासह राहत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब भीतीच्या छायेत असल्याने त्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहून त्यांना पाहिजे ती मदत देण्यास आम्ही तयार आहोत, असे शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी म्हणाले.
उत्तर प्रदेशमधील हाथरस अत्याचार घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध नोंदवत शिवसेनेच्या वतीने राज्यातील विविध शहरात आंदोलन छेडण्यात आले आहे. आज ठाण्यातही शिवसेनेने आंदोलन केले.
उल्हासनगर शिवसेना शहर शाखेच्यावतीने शिवाजी चौकात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पीडित मुलीच्या कुटूंबाला न्याय देऊन त्या नराधमांना फाशीच्या शिक्षेची मागणी केली. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी योगी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पीडितेला न्याय देण्याची मागणी केली. तर उल्हासनगर शहरात राहणारे पीडितेचे मोठे काका, चुलत भाऊ यांनी अखिल भारतीय नवयुवक वाल्मिकी संघाच्यावतीने कालच उल्हासनगर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला.
आमच्या मुलीवर बलात्कार करून हत्या केली, तिला अग्नी देण्याचा अधिकारही पोलिसांनी हिरावून घेतला,त्या पोलिसांनाही आरोपी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच या प्रकरणातील आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली. या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.