सातारा - कोल्हापूर, सांगली, सातारा क्षेत्रातील लघु पाटबंधारे तलाव, डोंगर माथ्यावरील पाझर तलाव तसेच हजारो शेतकऱ्यांच्या शेतात शेततळी झाल्यास कमीतकमी 25 ते 30 टीएमसी पाणी साठवणूक होवू शकेल व पावसाच्या दिवसात धरणे ओव्हर फ्लो झाल्यानंतर येणारी पूरपरिस्थिती बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येईल, असा विश्वास माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
कराड, सांगली आणि कोल्हापूर या शहरातील महापुराचा धोका टाळण्यासाठी सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावरील अनेक लघुपाटबंधारे तलावाची अपूर्ण कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर हजारो शेततळ्यांची नवीन साईट्स उपलब्ध आहेत. त्या क्षेत्रात पाणी साठवल्यास मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साठून राहील. या पाण्यावर अभयारण्याच्या भोवतालची अनेक गावे बागायत क्षेत्रात रुपांतरित होवून हजारो एकर क्षेत्र बारामाही पाण्याखाली येईल, असेही ते म्हणाले.
माजी मंत्री पाटणकर पुढे म्हणाले, एकट्या पाटण तालुक्यात डोंगरमाथ्यावरील सर्व शेतकऱ्यांना मागेल त्याला शेततळे ही योजना राबवून मोठ्या प्रमाणावर पाणी अडविले जाईल. या साठविलेल्या पाण्याचा वापर करून स्थानिक शेतकऱ्यांची कोरडवाहू जमीन बागायत होईल. डोंगरमाथ्यावरील अनेक गावातील शेतकऱ्यांची हजारो एकर शेती पाण्याखाली आल्याने त्यांचे जीवन समृद्ध होईल. पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतीवर पोटभरत नसल्याने पोट भरण्यासाठी मुंबई, पुणे या औद्योगिक नगरीकडे धावणारा शेतकरी वर्ग गावाकडे थांबून या अडविलेल्या पाण्यावर नवीन बागायत क्षेत्र निर्माण करून तो आपली शेती समृद्ध करू शकेल. त्यामुळे मोठ्या शहरात होणारा दाट लोकवस्तीचा प्रश्न सुटेल.