मुंबई - मुंबई महापालिकेच्या सुधार समितीची निवडणुकीत मंगळवारी पार पडली. या निवडणुकीत शिवसेना उमेदवार सदानंद परब यांनी भाजप उमेदवार विनोद मिश्रा यांचा ४ मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे. तर, काँग्रेस उमेदवार जावेद जुनेजा यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने स्थायी, शिक्षण, बेस्ट समिती नंतर आता सुधार समिती अध्यक्षपदावरही शिवसेनेनेच नाव कोरले आहे.
सध्या मुंबई महापालिकेच्या वैधानिक, विशेष आणि प्रभाग समित्यांच्या निवडणुका होत आहेत. शिक्षण, स्थायी, बेस्ट नंतर आज सुधार समितीची निवडणूक झाली. सुधार समितीचे एकूण २६ सदस्य आहेत. २६ सदस्यांपैकी ०१ सदस्य अनुपस्थित असल्याने २५ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. या निवडणुकीत शिवसेनेचे सदानंद परब हे १३ मते मिळवून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार विनोद मिश्रा यांना ९ मते मिळाली. या निवडणुकीत काँग्रेसचे ३ सदस्य मतदानाप्रसंगी तटस्थ राहिले. या निवडणुकीदरम्यान पीठासीन अधिकारी म्हणून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी काम पाहिले.