महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

कोरोनाला रोखण्यासाठी गावोगावी नियमपालनाची मोहीम आवश्यक - जिल्हाधिकारी शैलेश नवाल - Shailesh nawal on corona

कोरोनाच्या पहिल्या लाटेत गतवर्षी ग्रामस्तरीय समित्यांनी मोलाची भूमिका बजावून जनजागृती केली. तपासणी मोहिमा आणि अनेक सर्वेक्षणे पार पाडली.

Shailesh nawal
शैलेश नवाल

By

Published : May 7, 2021, 9:34 AM IST

अमरावती -जिल्ह्यात, शहरी भागात कोरोना संसर्ग कमी होऊन ग्रामीण भागात वाढू लागले आहे. त्यामुळे कोरोनाला आळा घालण्यासाठी ग्रामस्तरीय समित्यांनी ताकदीनिशी काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा -

जिल्ह्यातील विविध तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय समित्यांचा आढावा जिल्हाधिकारी नवाल हे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून नियमितपणे घेत आहेत. गुरुवारी अचलपूर तालुक्याच्या ऑनलाइन बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, तहसीलदार मदन जाधव आदी उपस्थित होते.

ग्रामस्तरीय समित्यांची भूमिका महत्त्वाची

जिल्हाधिकारी शैलेश नवाल म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत गतवर्षी ग्रामस्तरीय समित्यांनी मोलाची भूमिका बजावून जनजागृती केली. तपासणी मोहिमा आणि अनेक सर्वेक्षणे पार पाडली. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव बराच कमी झाला होता. मात्र, आता ग्रामीण भागातही पुन्हा साथीने डोके वर काढले आहे. अशावेळी काटेकोर नियम पालनासाठी ग्रामस्तरीय समितीची भूमिका महत्वपूर्ण आहे. अद्यापही अनेकजण लक्षणे असूनही तपासणी करत नाहीत किंवा गृह विलगीकरणातील व्यक्ती नियम पाळत नाही, अशा तक्रारी येत आहेत. हे थांबविण्यासाठी ग्रामस्तरीय समित्यांनी सर्वंकष प्रयत्न करावे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

सर्वांचा समन्वय हवा -

ग्रामस्तरावर सरपंच, ग्रा. पं. सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तलाठी, कोतवाल, वैद्यकीय अधिकारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका या सगळ्यांनी समन्वयाने काम करून साथ नियंत्रणासाठी योगदान द्यावे. एखादी बेजबाबदार व्यक्ती ऐकत नसेल व स्वत:सह इतरांचेही आरोग्य धोक्यात आणत असेल तर वेळीच पोलिसांना माहिती द्यावी. ग्रामस्तरीय समित्यांना संपूर्ण सहकार्य करण्याबाबत ग्रामीण पोलीस यंत्रणेला निर्देश देण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details