पुणे- पुण्यातील ससून रुग्णालयात व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे एका निवृत्त शास्त्रज्ञाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज पहाटे 2 च्या सुमारास घडली. मृत्यूनंतर केलेल्या कोरोना चाचणीत शास्त्रज्ञ पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. ही माहिती पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस, प्रवक्ते रमेश अय्यर यांनी दिली आहे.
काल (14 जुलै) सायंकाळी शास्त्रज्ञाला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्या रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध नव्हते. रुग्ण शास्त्रज्ञाची प्रकृती आणखी खालावली, त्यामुळे तेथील डॉक्टरांनी त्यांना इतर रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले.
दरम्यान, रुग्णाच्या नातेवाईकांनी पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते रमेश अय्यर यांच्याशी संपर्क साधला आणि परिस्थितीची माहिती दिली. अय्यर यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात फोन करून व्हेंटिलेटर उपलब्ध असणाऱ्या रुग्णालयाची माहिती मागवली. त्यानंतर माहिती मिळालेल्या चारही रुग्णालयात व्हेंटिलेटर विषयी चौकशी केली असता त्यांच्याकडे तो उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शेवटी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास रुग्णाला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ससून रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिथेही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. व्हेंटिलेटरसाठी 3 रुग्ण वेटिंग वर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रुग्णाला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर उपचारादरम्यान पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास रुग्ण शास्त्रज्ञाचा मृत्यू झाला. रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याचे मृत्यूनंतर आलेल्या चाचणी अहवालातून निष्पन्न झाले आहे.
वेळेत उपचार न मिळाल्यामुळे शास्त्रज्ञाचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस कोणाला जबाबदार धरावे आणि त्यांच्यावर कारवाई होणार का? असा सवाल अय्यर यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान या सर्व प्रकाराविषयी ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर मुरलीधर तांबे यांची प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.