नाशिक - बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील कोरोनामुळे एका तरूणाचा बुधवार (११ जून) मृत्यू झाला होता. या मृत कोरोनाबाधित तरुणाच्या संपर्कात आलेल्या १० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या अहवालामध्ये त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा आणि संपर्कात आलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून यामुळे आरोग्य यंत्रणा चांगलीच हादरली आहे. त्यामुळे सध्या जायखेडा आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
जायखेडा येथील खासगी वाहन चालकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्याचा वैद्यकीय अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे वैद्यकीय पथकाने त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि संपर्कातील 11 व्यक्तींते विलगीकरण करून त्यांचे घशातील स्त्राव वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले होते. यापैकी १० जणांचे वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे हे सर्वच रुग्ण राहत असलेला परिसर सध्या प्रतिबंधित करण्यात आला आहे. या रुग्णांच्या संपर्कात अजून कोणत्या व्यक्ती आल्या आहेत याचा शोध आरोग्य यंत्रणा, ग्रामपंचायत प्रशासन आणि महसूल विभागाने घेण्यास सुरुवात केली आहे. संपर्कातील व्यक्तींनी स्वतःच्या आणि परिवाराच्या हितासाठी स्वतःहून पुढे येऊन यंत्रणेला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.