महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

गोंदियात सुरू होणार कोरोनची 'रॅपिड अँटीजन तपासणी'.. - गोंदिया कोरोना रॅपिड चाचणी

सारी, आय.एल.आय, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे आजार त्याचप्रमाणे कायम स्वरुपी असणारे आजार, गरोदर महिला, ६० वर्षावरील व्यक्ती, तसेच कोरोना संशयीतांची तपासणी रॅपिड अँटीजन किटच्या माध्यमातून करता येणार आहे.

गोंदिया कोरोना रॅपिड चाचणी
गोंदिया कोरोना रॅपिड चाचणी

By

Published : Jul 16, 2020, 9:24 PM IST

गोंदिया : जिल्ह्यात कोरोना संक्रमणाविरुध्दचा लढा अधिक सशक्त व्हावा याकरिता तातडीने रॅपिड अँटीजन तपासणी सुरू करण्यात आली आहे. या तपासणीच्या माध्यमातून कोरोना संशयितांचे त्वरित निदान होण्यास मदत होणार आहे, असे मत जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयात या अनुषंगाने नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, की कोरोना संशयितांचे त्वरित निदान करण्यासाठी जिल्ह्यात रॅपिड तपासणी प्रक्रिया नुकतीच सुरू करण्यात आली आहे. पथदर्शी प्रकल्प म्हणून गोंदिया शहरातील कुंभारेनगर येथे ही तपासणी सुरू करण्यात आली आहे. कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या प्राथमिक तपासणी करीता टेस्ट किट अत्यंत उपयोगी आहे. या चाचणीचा अहवाल केवळ तीस मिनिटात उपलब्ध होतो. त्यामुळे प्रशासनाला जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सारी, आय.एल.आय, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे आजार त्याचप्रमाणे कायम स्वरुपी असणारे आजार, गरोदर महिला, ६० वर्षावरील व्यक्ती, तसेच कोरोना संशयीतांची तपासणी रॅपिड अँटीजन किटच्या माध्यमातून करता येणार आहे. रॅपिड अँटीजन टेस्टमधून संशयित व्यक्ती हा कोरोना बाधित असल्याचे निदान झाल्यास त्याच व्यक्तीला कोविड केअर सेन्टर अथवा संस्थात्मक विलगिकरण कक्षात दाखल करुन उपचार करण्यात येईल. जर व्यक्तीच्या टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला तर त्या व्यक्तीला घरी जाता येईल. तरी कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांनी न घाबरता आपली कोरोना रॅपिड अँटीजन चाचणी करण्यास पुढे यावे.

शस्त्रक्रिया, आपातकालीन आरोग्य प्रकरणे व कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना रॅपिड अँटीजन तपासणी करिता प्राधान्य देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील फिवर क्लीनीक, केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया, जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील कुंभारेनगर येथील कंटेन्मेंट झोनमध्ये रॅपिड अँटीजन तपासणीस १४ जुलैपासून पथदर्शी प्रकल्प म्हणून सुरुवात करण्यात आली आहे. या ठिकाणी १५ जुलैपर्यंत एकुण ७५ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत. रॅपिड अँटीजन टेस्ट किटच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीचे स्वॉब नमुने घेऊन मात्र १५ ते ३० मिनिटात अहवाल प्राप्त होतो. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास व्यक्ती कोरोना बाधित आहे. असे गृहीत धरुन त्या व्यक्तीवर उपचार केले जातात. व्यक्तीमध्ये आजाराची लक्षणे असूनही अहवाल निगेटिव्ह आल्यास संबंधित व्यक्तीचे पुन्हा स्वॅब नमुने घेऊन चाचणी प्रयोगशाळेत पाठविले जातात.

साधारणत: स्वॅब नमुने प्रयोगशाळेत पाठविल्यानंतर २४ ते ४८ तासात अहवाल प्राप्त होतो. यामुळे बराचसा वेळ जातो. परंतु, रॅपिड अँटीजन तपासणीच्या माध्यमातून अवघ्या ३० मिनीटात अहवाल प्राप्त होत असल्यामुळे प्रशासनाला जिल्ह्यात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यास मदत मिळणार आहे. जिल्ह्यातील इतर सर्व कंटेन्मेंट झोनमध्ये यापुढे रॅपिड अँटीजन टेस्टची सेवा सुरु करणार असल्याची माहिती यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details