महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

सार्वजनिक बांधकाम विभागाने परभणी महापालिकेस ठोठावला 1 लाखाचा दंड

जिंतूरातील शिवाजी पुतळ्यासमोर रस्त्याच्या दूरवस्थेस परभणी महानगर पालिका कारणीभूत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हटले आहे. त्यामुळे महापालिकेला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

परभणी महानगरपालिका
परभणी महानगरपालिका

By

Published : Sep 24, 2020, 6:59 PM IST

परभणी - शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनी दुरूस्तीच्या निमित्ताने विनापरवाना रस्ता खोदून नुकसान केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाने परभणी महानगरपालिकेस एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. जिंतूर येथील एका चौकात रस्ता खोदल्याने खड्डे पडले असून, काही सामाजिक संघटनांनी या खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन केले होते.


जिंतूर शहरातील रस्त्याच्या दुरवस्थेच्या निषेधार्थ येथील संभाजी ब्रिगेडने बांधकाम खात्याच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार मुख्य चौकातील खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर जिंतूरच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या सहायक अभियंत्यांनी आंदोलनकर्त्यांना एक पत्र पाठवून जिंतूर ते येलदरी (तहसील ते येलदरी कँप) या रस्त्यावर तहसील कार्यालयासमोर चार-पाच छोटे खड्डे पडले असल्याचे कबूल करत पावसाळ्यानंतर या खड्ड्यांची दुरूस्ती केली जाईल, असे आश्वासन दिले.

मात्र, जिंतूरातील शिवाजी पुतळ्यासमोर रस्त्याच्या दुरवस्थेस परभणी महानगर पालिका कारणीभूत असल्याचा देखील या पत्राद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाने खुलासा केला. परभणी महानगर पालिकेने येलदरी ते धर्मापुरी या जलवाहिनीची दुरूस्ती करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील चौकात विनापरवानगी रस्ता खोदला. तसेच रस्त्याचे नुकसान केल्याचे नमूद केले. त्यामुळे महापालिकेस नुकसानीपोटी एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, तो वसुल केला जाणार आहे, असेही या पत्रात म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details