कराड (सातारा)- भारतीय डाक विभागाने महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून ऑक्टोबर 2019 मध्ये देश पातळीवर पत्र लेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत कराड येथील प्रा. विनायक जाधव यांनी लिफाफा (A4) गटात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांना 25 हजार रुपयांचे बक्षिस मिळाले आहे.
नागरिक पत्र लेखनास प्रवृत्त व्हावेत, या उद्देशाने भारतीय डाक विभागाने महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून पत्र लेखन स्पर्धा आयोजित केली होती. इंग्रजी, हिंदी, मराठीसह स्थानिक भाषांमध्ये ही स्पर्धा झाली. 18 वर्षावरील आणि 18 वर्षाखालील, अशा एकूण 4 गटात झालेल्या स्पर्धेत प्रा. विनायक जाधव यांनी लिफाफा श्रेणीत राज्यात प्रथम क्रमांकाचे 25 हजार रुपयांचे बक्षिस पटकावले.
स्पर्धेच्या मूल्यमापन समितीमध्ये भाषा तज्ज्ञ, साहित्य तज्ज्ञ, शिक्षण तज्ज्ञ, नामवंत पत्रकारांचा समावेश होता. प्रा. जाधव हे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कराड येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. लिफाफा श्रेणीत खुल्या गटात 30 हजार स्पर्धकांनी भाग घेतला होता.
जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, सिक्किमचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, माजी सार्वजानिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर, माजी आमदार आनंदराव पाटील, श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, प्रशासन सहसचिव प्राचार्य डॉ. युवराज भोसले, प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, प्राचार्य डॉ. सुभाष शेळके, प्राचार्य डॉ. जे. एस. पाटील, प्राचार्य डॉ. अशोक करांडे यांनी प्रा. जाधव यांचे आभिनंदन केले.