ठाणे -कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. मात्र, कोरोना रोखण्यात शासन पहिल्या दिवसापासूनच संभ्रमावस्थेत असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही एकमेकांमध्ये समन्वय दिसत नाही. तीन पक्षांचे हे सरकार असल्याने त्यांच्यामध्ये ही समन्वय दिसत नाही. विरोधी पक्षनेते म्हणून आम्हालाही विश्वासात घेतले जात नसल्याचे दरेकर यांनी मह्टले आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर अशा संकटाच्या काळात एकत्रित प्रयत्न करावा लागतो. दुर्दैवाने असे प्रयत्न होतांना दिसत नाही. अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर केली. दरेकर हे भिवंडी महापालिका हद्दीतील कोविड -19 चा आढावा आणि त्यावर चर्चा करण्यासाठी पालिका आयुक्त आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक आयोजित केली होती. बैठक संपल्यावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.
भिवंडी शहरात मागील आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच गेल्या आठवड्यात स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्ण महिलेचा ऑक्सिजनचा वेळेवर पुरवठा होऊ न शकल्याने मृत्यू झाला होता. याच पार्श्वभूमीवर आज (शुक्रवारी) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पालिका मुख्यालयात पालिका आयुक्त व अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती.
दरेकर पुढे म्हणाले की, राज्य सरकारने 500 ते 1000 बेडचे रुग्णालय उभारले, मात्र, आता ते हवेत उडून गेले आहे त्याठिकाणी केवळ बेड ठेवून काय उपयोग. त्याठिकाणी डॉक्टर पाहिजे नर्सेस पाहिजे वैद्यकीय कर्मचारी पाहिजे हे तर त्या ठिकाणी उपलब्ध नाही. तर दुसरीकडे राज्य सरकार आपले अपयश झाकण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांवर राजकारण करीत असल्याचा आरोप करीत आहे. मात्र, अशा परिस्थितीत आम्ही राजकारण न करता संकटाच्या काळात सरकार सोबत आहोत, असेही दरेकर यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांच्यासोबत खासदार कपिल पाटील, भाजप शहराध्यक्ष संतोष शेट्टी, आमदार महेश चौगुले, महापौर प्रतिभाताई पाटील, पालिकेचे विरोधी पक्षनेते शाम अग्रवाल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.