औरंगाबाद - कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा,नाचनवेल,चिंचोली येथे अतिवृष्टी झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या सर्व शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई तत्काळ देण्यात यावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. तसेच येत्या आठ दिवसांत राज्य सरकारने जर अतिवृष्टीधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शेकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी यांनी घाटशेंद्रा येथील शेतकरी संवाद कार्यक्रमात केली. तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न दिल्यास भारतीय जनता पक्षाच्यावतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि राज्य सरकारला शेतकऱ्यांना मदत देण्यास भाग पडू असे आव्हानही त्यांनी दिले. तसेच आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. यासोबतच वाकी येथील अतिवृष्टीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे सांत्वनही केले.