मुंबई- वर्षभरात नव्या घरात राहायला जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या देशभरातील घर खरेदीदारांचे हे स्वप्न आता लबणार आहे. कारण 2020 मध्ये ज्या घरांचा ताबा होणार होता तो आता रखडणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे देशभरातील बांधकाम प्रकल्पाचे काम 3 महिने बंद होते, तर आता अनलॉकमध्ये मजूर नसल्याने काम ठप्प आहे. त्यामुळे या वर्षात सुमारे 4 लाख 66 हजार घरांचा ताबा रखडणार असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.
ऍनरॉक या मालमत्ता बाजारपेठेतील आघाडीच्या सर्वेक्षण कंपनीच्या अहवालानुसार देशातील 7 शहरात 4 लाख 66 हजार घरांचे काम सुरू आहे. ही घरे अशी आहेत की जी अंतिम टप्प्यात असून त्यांचा ताबा 2020 मध्ये देण्यात येणार होता. तर यातील अधिकाधिक घरे 2013-14 मध्ये बुक झालेली आहेत. याच दरम्यान या घरांच्या कामाला सुरुवात झाली आहे. पण मागील 3 महिन्यांपासून मुंबई असो वा दिल्ली लॉकडाऊनमुळे या घरासह नव्या प्रकल्पांची कामेही झाली आहेत.
अनलॉकमध्ये काम सुरू करण्यास परवानगी मिळाली, पण मुंबई आणि अन्य शहरात मजूरच मिळत नसल्याने आजही अनेक ठिकाणी काम बंद आहे व संथ गतीने सुरू आहे. तर ही परिस्थिती कधी बदलणार याचे उत्तर नाही. त्यामुळे या वर्षात 4 लाख 66 हजार घरांचे काम पूर्ण करत ताबा देणे बिल्डरांना अशक्य असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
या 4 लाख 66 हजार घरांपैकी 1 लाख 39 हजार घरे ही दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील आहेत. तर मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील 1 लाख 07 हजार घरांचा यात समावेश आहे. बंगळुरूमधील 50 हजार, पुण्यातील 69 हजार, कोलकाता 33 हजार 900, हैदराबाद 30 हजार 500 आणि चेन्नई 24 हजार 650 अशी घरांची संख्या आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेराकडून देशभरातील गृहप्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी 6 महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. पण एकूणच परिस्थिती पाहता पुढच्या 6 महिन्यात तरी ही घरे पूर्ण होतील की नाही, अशी भीती बिल्डरांमध्ये आहे. त्यामुळे या घरांचा ताबा 2020 मध्ये देणे शक्य होणार नसल्याचे ऍनरॉकचे म्हणणे आहे. महत्वाचे म्हणजे, 2020 मधील घरांचा ताबा रखडणार आहेच, पण त्याचवेळी 2021 मध्ये ताबा देण्याच्या प्रक्रियेतील 4 लाख 12 हजार घरांचीही कामे रखडली आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षीही आणखी 4 लाख 12 हजार घरांचा ताबा रखडणार आहे.