कराड (सातारा) -पाटण तालुक्यातील मानेगावच्या वैशाली माने यांना पोलीस अधीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली असून अमरावतीच्या पोलीस आयुक्तालयात त्या हजर झाल्या आहेत. माने यांच्या पदोन्नतीमुळे पाटणसह सातार्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अनेक ठिकाणी बजावली सेवा -
सातार्यातील हत्तीखाना येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. माध्यमिक शिक्षण कन्या शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षण सायन्स कॉलेज येथे झाले. इस्माईल मुल्ला लॉ कॉलेजमधून बीएसएलएलबीची पदवीही त्यांनी संपादन केली आहे. तसेच नुकतीच त्यांनी एलएलएमची पदवीही मिळविली आहे. 2009 साली एमपीएसी परीक्षेद्वारे त्यांची पोलीस उपअधीक्षकपदी निवड झाली होती. नाशिक येथे प्रशिक्षण घेऊन सिंधुदुर्ग येथे प्रशिक्षणार्थी कालावधी पूर्ण केला होता. त्यानंतर त्यांची कोल्हापूरला डीवायएसपी म्हणून नियुक्ती झाली होती. तेथून पुणे आयुक्त कार्यालयात त्यांची बदली झाली. चतु:शृंगी येथे सहायक पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी दोन वर्ष काम पाहिले.
सध्या त्या राज्य गुन्हे अन्वेशन विभागाच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या. त्यांना पोलीस अधीक्षकपदी पदोन्नती मिळाली असून अमरावती पोलीस आयुक्तालयात त्या हजर झाल्या आहेत. सातारा जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व शिक्षण सभापती प्राचार्य उत्तमराव माने यांच्या त्या कन्या आहेत.