पुणे- अखंड मानवजातीला कोरोना आजाराने धडकी भरवली आहे. शासन, प्रशासनाकडून कोरोनावर मात करण्यासह कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. मात्र बारामतीत कोरोना संबंधीच्या नियमांचे उल्लंघन करत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला हरताळ फासत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
देशासह राज्यात ठिकठिकाणी कोरोना सारख्या महामारीचा प्रादुर्भाव वाढत होता. त्यावेळी अवघ्या काही दिवसातच बारामती 'कोरोना मुक्त' झाली होती. मात्र काही बेफिकीर नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे शहरात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. अशा निष्काळजी व बेफिक्रीमुळे बारामतीत एकाच दिवशी 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. आतापर्यंत बारामतीत 36 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 22 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत कोरोनाने 4 बारामतीकरांचा बळी घेतला आहे.