महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

अखेर एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात थकीत वेतन जमा

मार्च महिन्याचा 25%, मे महिन्याचा 50% व जून महिन्याचे पूर्ण थकीत वेतन एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. मात्र जुलै महिन्याचे पगार पुन्हा थकीत आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Aug 8, 2020, 4:41 PM IST

मुंबई - राज्य शासनाने एसटी महामंडळाला 550 कोटी रुपयांची आर्थिक मदत केल्याने अखेर एसटी कर्मचाऱ्यांचा पगाराचा तिढा सुटला आहे. आज(शनिवार) एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात थकीत वेतन जमा झाले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लॉकडाऊनमुळे गेले साडेचार महिने प्रवासी वाहतूक बंद असल्याने एसटीला मोठया प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. परिणामी आधीच आर्थिक तोट्यात असलेल्या एसटीला कर्मचाऱ्यांचे संपूर्ण वेतनही देता आले नव्हते. अखेर परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी आर्थिक कचाट्यात सापडलेल्या एसटीला मदत करण्यासाठी राज्य शासनाला विनंती केली होती.

त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत 550 कोटी एसटीला देण्याचे जाहीर करण्यात आले होते. हे पैसे एसटी महामंडळाच्या खात्यात जमा झाले आहेत. अखेर आज मार्च महिन्याचा 25%, मे महिन्याचा 50% व जून महिन्याचे पूर्ण थकीत वेतन एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. मात्र जुलै महिन्याचे पगार पुन्हा थकीत आहे.

लॉकडाऊन कालावधीत स्थलांतरित मजूरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत एसटीने मोफत प्रवास उपलब्ध करून दिला. तर गेल्या दोन महिन्यांपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची प्रवासी वाहतूक एसटी बस मधून करण्यात येत आहे. पगार नसल्याने अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी घरखर्च चालविण्यासाठी भाजी, पाणीपुरी विकण्याचाही व्यवसाय केला. लवकरच एसटी कर्मचाऱ्यांना जुलैचा पगार देण्यासाठी प्रयत्न करू, असे एसटीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details