मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे ज्यांना लक्षणे नाहीत, अशा रुग्णांनी खाटा अडवून ठेवू नये, असे आवाहन मुंबई महानगरपालिका महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. तसेच भाजपाने टीका करण्यापेक्षा रस्त्यावर उतरून काम करावे, असेही महापौरांनी म्हटले आहे.
गरजवंतांना खाटा द्या
मुंबईमध्ये कोरोना रुग्नांची संख्या वाढत असताना बेड मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील काही खासगी रुग्णालयांना अचानक भेट देऊन परिस्थीची पाहणी केली. त्यानंतर महापौर बोलत होत्या. या भेटीदरम्यान रुग्णालयातील ज्यांना रुग्णालयाची गरज नाही असेही रुग्ण रुग्णालयात निदर्शनास आले. ज्यांना लक्षणे नाहीत असेही रुग्ण रुग्णालयात असल्याचे समोर आले. त्यामुळे रुग्णालयातील २७० बेड पालिकेच्या ताब्यात घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे महापौरांनी सांगितले. येत्या सोमवारपर्यंत १५० बेड पालिकेच्या ताब्यात येतील, अशी माहिती महापौरांनी दिली. महापालिका आणि राज्य सरकारकडून जितकी काळजी घेता येता येईल तितकी काळजी आमच्याकडून घेतली जात आहे. जे रुग्ण पॉझिटिव्ह आहेत आणि त्यांना लक्षणे आहेत अशांनाच बेड उपलब्ध करून द्या, असे निर्देश महापौरांनी यावेळी दिले.