पुणे - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला होता. यामुळे संपूर्ण पुणे शहर मागील दोन महिन्यांपासून बंद होते. लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपल्यानंतर हळूहळू पुणे शहर पूर्वपदावर येताना दिसत आहे. शहरातील जीवनावश्यक वस्तुंखेरीज इतर दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर आता शहरातील उद्याने उद्यापासून (3 जून) उघडणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.
त्यामुळे 3 जूनपासून पुणेकरांची लाडकी सारसबाग, संभाजी उद्यान आणि इतर उद्याने सर्व सर्वसामान्य पुणेकरांसाठी उघडी राहणार आहेत. आयुक्त शेखर गायकवाड यांनी यासंदर्भात आदेश काढला असून आता 65 ऐवजी 66 प्रतिबंधित क्षेत्र झाले आहेत. यातून अनेक वस्त्या कोरोनामुक्त झाल्या आहेत. तसेच प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर सर्व भागातील दुकाने सुरू होतील. 8 जूनपासून 10 टक्के मनुष्यबळासह खासगी कार्यालये उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत सुरू राहणार आहेत.