इस्लामाबाद - भारताने मागील वर्षी 5 ऑगस्टला जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यापासून पाकिस्तानचा जळफळाट होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीर मुद्दा मांडून भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून काश्मीर प्रश्नी मुस्लिम देशांची संघटना असलेल्या' ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (OIC) या संघटनेचा पाठिंबा मिळविण्यासाठी पाकिस्तानचा आटापिटा सुरु आहे. मात्र, पाकिस्तानचे हे स्वप्नही धुळीस मिळताना दिसत आहे.
काश्मीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी ओआयसीच्या परराष्ट्र मंत्री स्तरावर बैठक बोलविण्यासाठी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी मागील काही दिवसांपासून प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. या निराशेतून त्यांनी नुकतेच एक बेजबाबदारपणाचे वक्तव्य केले. कुरेशी यांनी सौदी अरेबिया बद्दल चुकीचे वक्तव्य केले. जर आयओसीने बैठक बोलावली नाही, तर पाकिस्तान काश्मीरप्रश्नी पाठिंबा असलेल्या देशांची संघटनेच्या बाहेर राहुन बैठक बोलावेल, असे कुरेशी म्हणाले. या वक्तव्यावरून पाकिस्तानातील विरोधी पक्षांनीही त्यांच्यावर टीका केली आहे.