इस्लामाबाद -दहशतवाद आणि अवैध कारवायांना पैसा पुरवत असल्याप्रकरणी ‘फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स’ (FATF) या जागतिक निगराणी संघटनेने पाकिस्तानला करड्या यादीत(ग्रे लिस्ट) टाकले आहे. मनी लाँड्रीग आणि दहशतवादाला पैसे पुरवणे थांबवण्यासाठी पाकिस्तानला कठोर पावले उचलण्यासही संघटनेने सांगितले आहे. त्यानुसार उपाययोजना करण्यासाठी पाकिस्तानने कायदा पास केला आहे. देशातील धार्मिक पक्षांचा विरोध असतानाही हा कायदा संसदेने पास केला.
जर 2020 ऑक्टोबरपर्यंत पाकिस्तान उपाययोजना करण्यास अपयशी ठरला तर काळ्या यादीत जाण्याचीही दाट शक्यता आहे. सध्या इराण आणि उत्तर कोरिया हे देश काळ्या यादीत आहेत.
जून 2018 पासून पाकिस्तान एफएफटीच्या करड्या यादीत आहे. या निर्बंधातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मात्र, संघटनने पाकिस्तानला आणखी कठोर पावले उचलण्यास सांगितले आहे. एफएटीएफ ही संघटना जागतिक मनी लाँड्रीग आणि दहशतवाद्यांना पैसा पुरविणाऱ्या प्रकरणांवर लक्ष ठेवून असते. या अंतर्गत कारवाई केल्यास एखाद्या देशाला आंतरराष्ट्रीय निधी मिळण्यात अडचणी येतात, तसेच आर्थिक बंधने लादली जातात.