मुंबई -मुंबई सध्या ऑक्सिजनचा तुटवडा हा कायम आहे. यामुळे रुग्णाच्या जीवास धोका निर्माण होतो. हा धोका कमी व्हावा, यासाठी भारतीय जनता पक्षाचे खासदार मनोज कोटक यांच्या नेतृत्वाखाली 100 ऑक्सिजन कंसंट्रेटर ईशान्य मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आले. कार्यकर्त्यांच्या मदतीने हे मशीन गरजूंना देण्यात येणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य व्यवस्थेवर ताण वाढत आहे. दुसरी लाट थोपवण्यासाठी सक्षम आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. त्याबरोबर विरोधकांनाही हातात हात घालून मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यानुसार भारतीय जनता पक्षाचे खासदार मनोज कोटक यांच्या नेतृत्वाखाली 100 ऑक्सिजन कंसंट्रेटर वाटप करण्यात आले.
भाजपकडून 100 ऑक्सिजन कंसंट्रेटर वाटप कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे बेड्स आणि ऑक्सिजन व्यवस्था कमी पडत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांचे होणारे हाल थांबावे यासाठी ईशान्य मुंबई भागात ऑक्सिजन कंसंट्रेटर सुपूर्त करत आहोत. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमार्फत सुविधा आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणार आहोत, असे कोटक यांनी सांगितले.
काय आहे ऑक्सिजन कंसंट्रेटर -
ऑक्सिजन कंसंट्रेटर ही सामान्य हवेद्वारे ऑक्सिजन तयार करणारी मशीन आहे. ही मशीन रुग्णांसाठी एक प्रकारची संजीवनीच आहे. ऑक्सिजन कंसंट्रेटर हे गृह विलगीकरणात असलेल्यांसाठी एक चांगला पर्याय आहे. देशात बीपीएल आणि फिलिप्स या दोन मुख्य कंपन्याच या मशीनचे उत्पादन करतात. हे ऑक्सिजन कंसंट्रेटर ऑक्सिजन सिलिंडरपेक्षा खूप वेगळे असतात. ऑक्सिजन सिलिंडर आणि रिफलिंगच्या तुलनेत या मशीन स्वस्त आणि सुरक्षित आहेत. कंसंट्रेटर ऑक्सिजनचे नवीन मॉल्युक्लर बनवत नाहीत. तर हवेतील नायट्रोजन वेगळे करतात, त्यातून ऑक्सिजन कायम राहतो.