पुणे - महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. मात्र, केंद्र सरकार महाराष्ट्राला जाणिवपूर्वक कमी प्रमाणात लस देवून महाराष्ट्र सरकारला म्हणजेच महाराष्ट्राच्या जनतेला वेठीला धरत आहे.. केंद्र शासनाने भाजपची सत्ता असणाऱ्या राज्यांना मोठ्या प्रमाणात लस देणे आणि महाराष्ट्राला कमी प्रमाणात लस देणे हे महाराष्ट्रातील जनतेच्या जिवाशी खेळण्यासारखे आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कोरोना लसीचे राजकारण थांबवावे. अन्यथा सिरम इन्स्टिट्यूटमधून लस बाहेर पडू देणार नाही, असा इशारा पुणे शहर शिवसेनेच्या वतीने केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांना देण्यात आला आहे.
शिवसेनेचे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र
पुणे शहर शिवसेनेच्या वतीने सहसंपर्कप्रमुख श्याम देशपांडे, प्रशांत बधे, जिल्हाप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, विजय देशमुख यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांना याबाबत पत्र पाठवले आहे.
इतर राज्यांकडे लक्ष देऊ नये असे नव्हे, तर…
पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोव्हिशिल्ड लस तयार होते. येत्या आठ दिवसात महाराष्ट्राला जर लस वाढवून दिली नाही तर आम्ही ही लस पुण्याबाहेर जाऊ देणार नाही, असा इशारा या पत्रातून देण्यात आला आहे. ही मागणी करताना इतर राज्यातील नागरिकांना लक्ष देऊ नये हा उद्देश नाही. तर महाराष्ट्रातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी लस मिळावी, हा उद्देश असल्याचे पत्रात स्पष्ट केले आहे.
पाकिस्तान जवळचा वाटतोय काय?
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. आता लसीकरणही सुरू झाले आहे. पण महाराष्ट्रात लस कमी पडत आहे. काही ठिकाणी लसी अभावी लसीकरण ठप्प पडले आहे. अनेक जिल्ह्यात लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. मात्र केंद्र सरकार महाराष्ट्राला जाणीवपूर्वक कमी प्रमाणात लस देऊन राज्य सरकारला वेठीस धरत आहे, असा आरोपही या पत्रातून करण्यात आला आहे. तसेच आपल्या जनतेला वाऱ्यावर सोडून शत्रू राष्ट्र पाकिस्तानला लस देणे यातूनच तुमचे बेगडी हिंदुत्व दिसून येत आहे. देशातल्या रुग्णांपेक्षा तुम्हाला पाकिस्तान जवळचा वाटतोय का? अशी विचारणा या पत्रातून करण्यात आली आहे.