औरंगाबाद - पैशाच्या देवाण घेवाणीतून वृद्धाची हत्या झाल्याचा प्रकार आज समोर आला. तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या वृद्धाचा मृतदेह चाटे शाळेच्या मागे असलेल्या विहिरीत पोत्यात सापडला. मुजीब अहमद खान (वय 59 वर्षे रा. शहा नगर, बीड बायपास, औरंगाबाद) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते एस.टी महामंडळातून सेवा निवृत्त होणार होते. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मृत खान हे एस.टी. महामंडळामध्ये नोकरीस आहेत. ते निवृत्तीच्या उंबरठ्यावर असल्याने गुरुवारी ते क्रांतिचौक येथील कार्यालयात निवृत्तीनंतर लागणाऱ्या कागदपत्रांची आणि प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी गेले होते. मात्र ते घरी आलेच नाही. याबाबत नातेवाईकांनी बेपत्ता असल्याची तक्रार क्रांतिचौक पोलीस ठाण्यात दिली होती. त्यासह त्यांचा अपहरण झाल्याचा संशय देखील नातेवाईकांनी पोलिसांकडे व्यक्त केला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी या प्रकरणाच्या खोलात जाऊन माहिती मिळवली असता मृत खान यांचा 8 लाख रुपयांचा आर्थिक वाद असल्याचे समोर आले.
शिंदे यांच्या पथकाने संशयावरून आतिक व आसिफ या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांना विचारपूस केली असता दोघांनीही पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. आज सकाळी पुन्हा दोघांकडे विचारणा करण्यात आली असता दोघांची उत्तरे वेगवेगळी असल्याने पोलिसांना संशय आला. दोघांना पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी खान यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याची कबुली दिली. तसेच, खान यांचा मृतदेह सातारा परिसरातील चाटे शाळेच्या मागे असलेल्या विहिरीत पोत्यात बांधून फेकल्याची माहिती दिली.